सध्याच्या काळात मोबाईल हे अत्यंत बहुउपयोगी साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते.अगदी अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखा एका क्षणात हवं ते क्षणात समोर आणून उभा करतो. पण त्याचा वापर करता करता सवयीचं रुपांतर व्यसनाधीनतेत कधी आणि कसं झालं ते कुणालाच कळलं नाही. शाळेत असताना असून अडचण नसून खोळंबा ही म्हण फक्त तोंडपाठ केली होती. त्याची प्रचिती मोबाईलबाबतीत येत आहे.
मागील आठवड्यात मोबाईल हवा (पहिले दोन मोबाईल असताना) म्हणून एका युवकाने आत्महत्या केली. मोबाईल खेळू नकोस म्हणून आई रागावली की मुलाने आत्महत्या केली. टिक टाँक अॅप वरती मस्ती करताना तिघांचा बळी, सेल्फी घेत असताना गेलेले शेकडो बळी अशा एकंदर घटनांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की यामध्ये केवळ मुले,युवक वा मुली आहेत असं नाही तर सर्वच वयोगटातील आबालवृद्धांच्या समावेश आहे.आज मोबाईलशिवाय माणूस कल्पना करणं जरा कठीण वाटावं इतका सर्वाठायी याचा वापर होत आहे आणि हेच आजच्या घटनांचं कारण ठरत आहे. मग या मोबाईलचं करावं तरी काय असा प्रश्न पडतो?
प्रत्येक मोबाईल वापरणाºयांनी स्वत:शी प्रामाणिक राहून आज आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.आपण दिवसभरात किती तास मोबाईल वापरतो.केवळ बोलणे, वागणे महत्त्वाच्या कामासाठी किती वेळ मोबाईल वापरतो. रात्री किती वेळ आपण याचा वापर करतो.आपली झोपतरी पूर्ण होते का? आपण लहान मुलांना का मोबाईल देतो ? खरंच ते योग्य आहे का ? शाळकरी मुलांना खरंच यांची गरज आहे का ? लहानथोर सारेच मोबाईलवर गेम खेळताना अक्षरश: वेडे होऊन जातात ते टाळून खरंच याला काही पर्याय निघू शकतो का? सर्व प्रश्नांची उत्तरे समर्पक डाऊनलोड होतात का?
वेळ, श्रम, पैसा यांचा होणारा अपव्यय आपणास खरंच टाळता येतो का? आज माणसं माणसाजवळ असली तरी मुकी व संवेदनाहीन का बनत आहेत? खरंच आज मृत्यूचे कारण मोबाईल होऊन गेलेले जीव परत आणता तर येणार नाहीतच पण पुढे होऊ नयेत म्हणून काही करता येईल का ? यावर सामाजिक चिंतन व्हायलाच हवं.कारण कोणत्याही गरजेचं हौसेत अतिरेकी रुपांतर झालं की चिंतेचं कारण बनतं,तेव्हा सावधान.. आमच्या अस्वास्थ्याच्या अनेक कारणांपैकी एक ठोस कारण आमचा मोबाईल बनला आहे.तो इतका की घरात मीठ नसलं तर नो प्रॉब्लेम पण मोबाईलला नेट हवंच,इतकं ते मूलभूत ठरावं,यावर विचार करावा लागेल.अगदी जाणीवपूर्वक. या मोबाईलचं करावं काय ? त्याला टाळता तर येणार नाही आणि कवटाळूनही चालणार नाही.
जोपर्यंत आपण मोठी माणसं मोबाईल साक्षर होणार नाहीत, मोबाईल वापराबाबत अनभिज्ञता टाळणार नाही,तोपर्यंत मुलांना आपण काही सांगू शकणार नाही. काही जणांना तर अगदी उजाडलेलंही लक्षात येत नाही. मोबाईल वापरताना सारासार विचार करणं यावर आज आत्ता ताबडतोब करावा लागेल नाहीतर मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्याची वेळ येईल.तेव्हा सावधान...आगे बहुत बडा धोका है ’. आपलं लाईफव्हॅल्यू लाईक्स वा कमेंटवर किंवा फेसबुक व्हॉट्सअॅप फ्रेंडच्या संख्येवर ठरवू नका.आम्ही संवेदनशीलता हरवत चाललो आहोत. माणसात राहून माणसासारखे राहू या..
मोबाईल हे दुधारी शस्त्र बनत आहे सांभाळून वापरावे लागेल. कोणतीही गाडी चालवताना मोबाईल वापरुच नये,मुलांच्या काळजीपोटी जरुर त्यांना मोबाईल द्या पण फक्त संपर्कासाठी उपयोगी पडावा असाच तो असावा, महागड्या मोबाईल संग्रहापेक्षा लाख मोलाची माणसं जोडू या. आम्ही सध्या फार काळ आॅनलाईन असतो थोडं आॅफलाईनही राहू या. याचा सराव करुया. घरात काडीपेटी असते त्याने दिवा व आग दोन्ही लावता येते म्हणून आपण ऊठसूठ आग थोडीच लावतो ? तेच तंत्र आज मोबाईल बाबत वापरलं,मोबाईल वापरायचं खरंच काही वेळापत्रक बनवता येईल (कॉलशिवाय) , टाईम लिमिट ठेवूया. जीवन सुंदर आहेच जगणंही खूप खूप सुंदर बनेल.असं वाटतं चला तर मग... विचार करुया....अगदी नक्कीच... - रवींद्र देशमुख(लेखक सृजनशील साहित्यिक आहेत)