गीतकार हसरत जयपुरी यांना संगम चित्रपटासाठी क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया हे गीत लिहिताना वाटले तरी असेल का, की या गाण्याने एखाद्या निष्पापावर खुनाचा आरोप येऊ शकेल !
दशरथ केसची कागदपत्रे घेऊन आॅफिसला आला. त्याची मुलगी राधा हिला नवºयाचा खुनाबद्दल अटक झालेली होती. तिचा जामिनाचा अर्ज आम्ही दाखल केला. तिची जामिनावर मुक्तता झाली. जामिनावर सुटल्यानंतर दशरथ व राधा आॅफिसला भेटण्यास आले. येताना मासे घेऊन आले होते. खरे काय असे राधाला विचारले असताना तिने ठामपणे सांगितले की, तिने काही केलेले नाही.
अत्यंत देखणी असलेल्या राधाचा जन्म गरीब कुटुंबात झालेला होता. परमेश्वराने तिला या पृथ्वीतलावर पाठविताना कोणतीही कसूर बाकी ठेवलेली नव्हती. सौंदर्य हा काहीजणांना शाप असतो. त्यापैकीच राधा एक. ती वयात येण्याच्या आतच तिच्या वडिलांनी तिचे लग्न पहिली दोन लग्ने झालेल्या व त्या बायकांना सोडून दिलेल्या पैसेवाल्या वयस्कर माणसाशी लावून दिले. लग्नानंतर राधा नवºयाकडे नांदण्यास गेली. सोळके झाल्यानंतर माहेरी आली. तिच्या जवळच्या मैत्रिणीने तिला कसे चालले आहे असे विचारले असता ती म्हणाली ‘क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया’.
सोळके झाल्यानंतर राधा नवºयाकडे नांदण्यास गेली. नदीकाठी त्यांची वस्ती होती. लग्नाला अवघे दोन महिनेसुद्धा झाले नसतील, राधाचा नवरा गायब झाला. त्याचे प्रेत दोन दिवसानंतर नदीच्या बंधाºयात मिळून आले. डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदनावरुन मयताचा खून करुन त्याचे प्रेत नदीमध्ये फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. दोनच महिन्यात राधाला वैधव्य आले. पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळून येत नव्हते.
पोलिसांनी अनेकांच्या जबान्या घेतल्या. राधाच्या त्या मैत्रिणीचा देखील जबाब घेतला. तिने सोळके झाल्यानंतर राधा ज्यावेळी माहेरी आली होती. त्यावेळी कसे काय आहे विचारले असता राधा क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया असे म्हणाल्याचे सांगितले. पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठत बिचाºया राधाला अटक केली व कोठडीत टाकले. राधा मी निष्पाप आहे असा टाहो फोडून सांगत होती, तरीही पोलीस ऐकण्यास तयार नव्हते. नेहमीसारखे पोलिसांनी पुरावे तयार करुन राधाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. नवरा पसंत नसल्यामुळे राधाने नवºयाचा काटा काढला अशा प्रकारचा खोटा पुरावा तयार केला होता.
कस्टोडीयल डेथ ची केस असल्यामुळे केस शाबीत होण्यास कोणतीही अडचण नसल्याने सरकारी वकील खुशीत होते. नवºयाची दुसरी बायको व तिच्या भावाने राधाच्या लग्नानंतर नवºयाबरोबर जोरदार भांडण करून त्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती असे नवरा म्हणत होता असे राधाने केसबद्दल माहिती देत असताना सांगितले होते. तोच धागा घेऊन आम्ही केस लढवली. पोस्ट मॉर्टेम करणाºया डॉक्टरने आम्ही घेतलेल्या उलट तपासात स्पष्टपणे कबुली दिली की, मयतास झालेल्या जखमा दोन प्रकारच्या हत्याराने झालेल्या आहेत. त्यामुळे मारेकरी एकापेक्षा जास्त असले पाहिजेत. घटना झालेल्या ठिकाणापासून ज्या ठिकाणी प्रेत सापडले त्या ठिकाणचे अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
प्रेताला ओेढत नेल्याबद्दलच्या कोणत्याही खाणाखुणा प्रेतावर नव्हत्या व घटनास्थळी नव्हत्या. मयताने दुसरी बायको व तिच्या भावाविरुद्ध पोलीस स्टेशनला दिलेली फिर्याददेखील आम्ही न्यायालयासमोर हजर केली. न्यायदेवतेने राधाला अखेर न्याय दिला. एका निष्पापाला जीवदान दिले. राधा निर्दोष सुटली. निष्पापाला न्याय मिळवून दिल्याबद्दल आम्हालासुध्दा खूप मानसिक समाधान वाटले.सहा महिन्यानंतर तिच्या वडिलाने राधाचा पुनर्विवाह लावून दिला. राधा व तिचा नवरा अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले होते. दर्शन झाल्यानंतर राधा व तिचा नवरा आॅफिसवर पेढे घेऊन भेटण्यासाठी आले. लक्ष्मीनारायणाची जोडी होती. राधाचा नवरा तरुण व अत्यंत देखणा होता. पूर्वीसारखा बुढ्ढा नव्हता !!!
- अॅड. धनंजय माने (लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)