सोलापूर : बार्शी तालुक्यातील येळंब येथील शेतात जाण्यासाठी शेतकऱ्याच्या बाजूने रस्त्याचा निकाल लागूनही त्याची पूर्तता प्रशासनाने केली नाही. रस्ताच नसल्याने शेतात जाऊन मशागत करण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टर द्यावे, अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे शेतकरी ज्ञानदेव काळदाते व त्यांचा मुलगा शंकर काळदाते यांनी केली.
काळदाते या शेतकऱ्याने त्याच्या मालकीच्या १८३ व १८४ गट क्रमांकाच्या शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून ३ सप्टेंबर २०२२ रोजी तहसील कार्यालय बार्शी यांच्याकडे नवीन रस्ता मिळावा म्हणून कायदेशीर अर्ज केला होता. याबाबत त्याची ऑगस्ट २०२२ मध्ये चौकशी झाल्यानंतर प्रशासकीय आदेश झाला. काळदाते यांना १० फुट रुंदीचा नवीन बैलगाडी रस्ता मंजूर करण्याबाबत प्रशासकीय आदेश दिला. त्यावर संबंधित मंडलाधिकारी यांनी तहसील प्रशासनाला पत्रव्यवहार करत तहसील आदेशात कोणत्या बाजूचे क्षेत्र द्यायचे असा उल्लेख नाही किंवा अधिकृत आदेश नाही. त्यामुळे रस्त्याचे कामकाज ठप्प होऊन गाडी रस्ता तयार करता आला नाही, असे सांगण्यात आले.
यामुळे आदेश दिलेल्या रस्त्यासाठी दिरंगाई होऊ लागल्याने मशागत करण्यासाठी अडचण येऊ लागली आहे. त्यामुळे यातील शेतकरी काळदाते यांनी तहसील प्रशासनाकडे जाण्यासाठी हेलीकॉप्टर देण्यात यावे अशी मागणी केली आहे.