सोलापूर : सध्या हवा बदलतेय. सकाळी गारवा असतो, दुपारी ऊन, तर संध्याकाळी पाऊस. बदललेल्या या वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या सध्या व्हायरल इन्फेक्शनवर आजीबाईंचा बटवाच कामी येताना दिसत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशात खवखव, घशाला सूज येणे, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, कोरडा खोकला यासारखा त्रास होतो. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधी घेतात; परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला येत असल्यास काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरत आहेत. अनेकदा, नेहमी घेण्यात येणाऱ्या औषधींमुळे शरीरावर साइड इफेक्ट हाेऊ शकतात. मात्र, यापासून कोणतेही नुकसान पोहोचत नाही, त्यामुळे औषधी घेण्यापेक्षा आयुर्वेदिक औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
घरगुती उपाय....
- - दूध आणि हळद : गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा हळद टाकून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो.
- - आल्याचा चहा : आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
- - लिंबू आणि मध : दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
- - तुळशीची पानं आणि आलं : एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा प्यावा.
औषधी आणि पथ्य
- आयुर्वेदिक उपचार फायदेशीर असला तरी त्याकरिता पथ्य पाळणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तेलकट, तिखट, आंबट चिकन, मटण, अंडी हे किमान १५ दिवस खाणे टाळले तर अधिक फायदेशीर होऊ शकते.
- याचबरोबर मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखू या व्यसनापासून दूर राहिल्याने या औषधींचा अधिक फायदा होऊ शकतो.