सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मतदार यादीसाठी ६९ हरकती मान्य केल्याने मतदार यादीत वाढ होणार आहे. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याबाबतची हरकत मान्य केल्याने त्यांचे मतदार यादीतील नाव कमी होणार आहे. ४८ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. १० जानेवारी रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी ११७ हरकती आल्या आहेत. एक तक्रार नावात दुरुस्ती करण्यासाठी देण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सांगवीच्या श्रीगणेश दूध संस्थेचे लेखापरीक्षण झाले नसताना या संस्थेचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे नाव मतदार यादीत आले आहे. याला जगदंबा दूध संस्था डिकसळ संस्थेच्या वतीने हरकत घेण्यात आली होती. ती मान्य करण्यात आल्याने म्हेत्रे यांचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार आहे. प्रारूप मतदार यादीत १० तालुक्यांतील २६३ दूध संस्थांची नावे होती. म्हेत्रे यांचे नाव वगळल्याने २६२ संस्था राहणार असून, हरकती मान्य झालेल्या ६८ संस्थांचा मतदार यादीत समावेश होणार आहे.
- सोनारसिद्ध खोमनाळ, गणेश फटेवाडी, गंगामाई पानगाव, नीलकंठेश्वर पानगाव, खंडेराया कारी, विक्रांत-विजय पिरटाकळी, शेतकरी कुरघोट, गुरू सोमलिंग विंचूर, भीमा खोरे एकविरे, सिंधुबाई डोंगरे अंजनगाव, जय किसान येळंब, दिलीपराव माने नंदूर, पंचबेबी डोंगरगाव व यल्लमा दहिवडी या दूध संस्थांची नावे कमी करण्यासाठी हरकती आल्या होत्या. मात्र, त्या अमान्य केल्याने या संस्थांची नावे मतदार यादीत राहणार आहेत.
- मतदार यादीत समावेश करण्यासाठी मोहोळच्या ८० हरकतीपैकी ४७ मान्य, तर ३३ अमान्य, बार्शी तालुक्याची असलेली एक तक्रार मान्य करण्यात आली आहे. माढा तालुक्याच्या तीन हरकती मान्य, तर ९ अमान्य, मंगळवेढा दोन हरकती मान्य, सांगोला तालुक्यातील ६ दूध संस्थांनी मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठीच्या हरकतीमधील एक मान्य, तर ५ अमान्य करण्यात आल्या आहेत.
- * २९ डिसेंबर रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी दूध संस्था डाॅ. महेश कदम यांनी हरकतीवर सुनावणी घेऊन ६९ हरकती मान्य, तर ४८ अमान्य करण्यात आल्या. १० जानेवारी रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.