सोलापूर : मैत्री या विषयावर ‘दोस्ती’ या नावाचा चित्रपट १९६४ मध्ये प्रदर्शित झाला होता. एक अंध आणि एक अपंग मित्र असलेला हा चित्रपट. अगदी त्याचप्रमाणे सोलापुरातील सिद्राम जगताप आणि सिद्राम साबळे एकमेका साह्य करत जीवन जगत आहेत. या दोघा मित्रांना एकत्र पाहिलेतर दोस्ती चित्रपटातील क्षण समोर येतो. दोघेही एका गुरुद्वारा येथे जेवण घेण्यासाठी येत असत, अगदी सुरुवातीला त्यांच्यात सख्य नव्हते. दोघेही वेगवेगळे बसून भिक्षा मागत. एकेदिवशी आपण एकत्र भिक्षा मागू त्यामुळे आपल्या दोघांचा फायदा नक्की होईल. तू मला उचलून चालताना साथ दे आणि मी तुला कुठे जायचे ते सांगेन, म्हणत मैत्रीला सुरुवात झाली. गेली पाच वर्षे दोघांची मैत्री टिकून असून कोरोनाकाळात निर्बंध आले, सर्व बंद असून देखील त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.
‘राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है’, ‘जाने वालो जरा मुड के देखो जरा’ या गाण्यांप्रमाणे शेळगी येथील हे दोन मित्र एकमेकांना साह्य करीत भिक्षा मागून आपला गुजारा करीत आहेत. दोघा मित्रांपैकी एकास दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तर एकजण पायाने अपंग असल्याने सहकार्याशिवाय चालता येत नाही. अशी परिस्थिती असून देखील गेली पाच वर्षे न चुकता सोलापुरातील गुरुद्वारा, गैबी पीर दर्गा, सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी फिरून भिक्षा मागत असतात. विशेष म्हणजे, ते केवळ भिक्षेत केवळ जेवण आणि अन्नाची मागणी करतात ते पैसे मागत नाहीत.
---
असा असतो दिनक्रम
सकाळी सात रस्त्यापासून चालत येऊन अंत्रोळीकरनगर येथील गुरुद्वारामधून जेवण घेतात, त्यानंतर परिसरात भिक्षा मागून, गैबीपीर दर्गा येथे दुपारी बसून जे काय भिक्षा मिळेल ते घेऊन संध्याकाळी सिद्धेश्वर मंदिर परिसरात भिक्षा मागून परत आपल्या घरी जातात.
आम्ही दोघे गेली पाच वर्षे एकत्र येऊन भिक्षा मागत आहोत, मला दिसत नाही त्याला चालता येत नाही, तो काठीच्या साह्याने आधार घेत चालतो आणि मला कुठे जायचे ते सांगतो.
- सिद्राम जगताप आणि सिद्राम साबळे