सोलापूर : अनेकांच्या लक्षात स्वत:चे सोडून इतरांचे मोबाइल नंबर पाठ नसतात. मोबाइलसह इतर गॅजेटवर अवलंबून राहत असल्यामुळे हे घडत आहे. हातात आलेल्या मोबाइलने घड्याळ, टीव्ही, रेडिओ आपल्यात सामावून घेतलं असं म्हणतात. अलीकडे मात्र मोबाइलने आपल्या मेंदूचाही ताबा घेतलासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मोबाइलही हल्ली जीवनावश्यक गरज बनून राहिली आहे. मागील काही दिवसांत कोणीही भेटलं किंवा नवीन ओळख झाली की त्यांचा नंबर नावाने मोबाइलमध्ये ठेवण्याची सवय जडली आहे. कोणाला फोन करायचं म्हटलं तर नावाने नंबर शोधून थेट डायल करण्याच्या सवयीने अनेकांना स्वत:च्या दुसऱ्या नंबरसह कुटुंबीयांचेही नंबर पाठ नसल्याचे पुढं आले आहे.
-------
असे का होते..?
- 1 पूर्वी डायरीमध्ये नंबर लिहून ठेवण्याची प्रद्धत होती. आता जवळपास संपुष्टात आली आहे.
- 2. लँडलाइनमध्ये फोन बुक नसल्याने सारखे डायल करून नंबर लक्षात राहत होता.
- 3. आता स्मार्टफोन आल्यामुळे नंबर सेव्ह करण्यासाठी मेमरी अधिक मिळते. तसेच इंटरनेट व इमेलवरही कॉन्टॅक्टचा बॅकॲप ठेवता येतो. त्यामुळे नंबर विसरला तर काय याची काळजी राहिली नाही.
--------
हे टाळण्यासाठी...
कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची प्रत्येकाची स्वतंत्र पद्धती आहे. दहा अंकी नंबरमधून काहींना दोन दोन अंक लक्षात ठेवून पूर्ण नंबर पाठ होऊ शकतो. काही जण मात्र पहिले आणि नंतरचे पाच आकडे ध्यानात ठेवून फोन नंबर पाठ करतात. अनेकांना नंबर पाठ करण्यापेक्षा तो वारंवार डायल केल्यानंतर लक्षात राहतो.
---------
मुलांना... आजोबाला नंबर्स पाठ, कारण...
आजोबा
पूर्वीपासून घरात साधा फोन वापरण्याची सवय असल्याने आजोबांच्या मेंदूला नंबर पाठ करण्याची सवय लागली आहे. डायरी आणि कॅलेंडरवर ते नंबर लिहितात. त्यातून पाहून नंबर डायल करण्याची सवय लागल्याने त्यांना अन्य कुटुंबीयांच्या तुलनेत सर्वाधिक नंबर पाठ असतात.
-----
बाबा/आई
बाबा हे कामावर जात असतात. त्यांच्याकडे स्मार्टफोन असतो. त्यामुळे ते यातच नंबर सेव्ह करतात. अनेकदा स्वत:चाच दुसरा नंबर अनेकांना पाठ नसतो. आई आणि बाबा यांना स्मार्टफोनची सवय असल्यामुळे त्यांच्या मोबाइलमध्ये नंबर सेव्ह असतात. त्यामुळे त्यांना पाठ होत नाही.
----
लहान मुलगा
घरातील लहान मुले तुलनेने कमी प्रमाणात मोबाइल वापरतात. पालक हे मुलांना त्यांचा व घरातील लँडलाइन नंबर पाठ करायला लावतात. त्यामुळे लहान मुलांच्या लक्षात नंबर राहतात.
---------
मोबाइलवर अवलंबून राहिल्यामुळे लक्षात ठेवण्याची कला आपण विसरत चाललो आहोत. एखादी बाब मनापासून आणि वारंवार केल्याने लक्षात राहते. तसेच नंबरचेही आहे. मोठे नंबर लक्षात ठेवत नसतील तर चालू शकते. मात्र, मुलांना तरी ही सवय नसायला हवी.
- डॉ. कुंदन कांबळे, मानसोपचार तज्ज्ञ, शासकीय रुग्णालय
*******