सोलापूर - पीएम केअर्स फंडातून सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स अनेकदा बंद पडत असल्याच्या तक्रारी डॉक्टर करीत आहेत. हे व्हेंटिलेटर्स म्हणजे असून अडचण नसून खोळंबा ठरले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये व्हेंटिलेटर्सअभावी अनेकांचा जीव गेला. या दुसऱ्या लाटेत देशभरात पीएम केअर्स फंडातून व्हेंटिलेटर्स देण्यात आले,परंतु या व्हेंटिलेटरबद्दल देशभरातून तक्रारी येत आहेत. सोलापूर महापालिकेला पीएम केअर्स फंडातून एकूण ११ व्हेंटिलेटर्स मिळाले होते. मनपाकडे फिजिशियन नसल्याने व्हेंटिलेंटर्स व साहित्य शासकीय रुग्णालयाला देण्यात आले. येथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अतिगंभीर रुग्णांच्या वापर करताना हे व्हेंटिलेटर व्यवस्थित काम करत नाहीत. नादुरुस्त व्हेंटिलेटर हे रुग्णांसाठी बिनकामाचे ठरत आहेत. तरीही हे व्हेंटिलेटर दुरुस्त करून रुग्णांना वापरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
नवीन व्हेंटिलेटरची अशी अवस्था असेल तर रुग्णांचा जीव कसा वाचणार, असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. व्हेंटिलेटरसाठी रुग्ण वेटिंगवर असतात. त्याचवेळी नवे व्हेंटिलेटर वापरता येत नसल्याची स्थिती आहे. काही काळ हे व्हेंटिलेटर बंद असताना अभियंत्यांकडून दुरुस्त करण्यात आले. त्यानंतर व्हेंटिलेटर व्यवस्थित चालत आहेत. तरीही अधूनमधून व्हेंटिलेटरबाबत तक्रारी येतच आहेत.
वापर करताना तांत्रिक अडचण
रुग्णाच्या प्रकृतीवरुन त्याला किती ऑक्सिजन द्यायचा हे ठरवले जाते. त्याची सेटिंग करण्याची यंत्रणा खराब होते. त्यामुळे पीएम केअरमधील व्हेंटिलेटरचा वापर करणे शक्य होत नाही. रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर त्याला दुरुस्त करण्याशिवाय पर्याय नसतो.पीएम केअरमधून आलेले व्हेंटिलेटर सिव्हिल हॉस्पिटलमध्येही आहेत. या व्हेंटिलेटरला तांत्रिक अडचणी येतात; मात्र वेळोवेळी त्याची देखभाल करुन दुरुस्त करण्यात येतात. रुग्णांना अडचण येऊ देत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रशासनाकडून प्रतिसाद नाही
या व्हेंटिलेटर्सचे अनेक वाईट अनुभव सिव्हिलमधील डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. ही बाब वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आली आहे. सिव्हिलचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना संपर्क केला असता त्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिला नाही.