सोलापूर : सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी असेल तर हद्दवाढ, झोपडपट्टी अन् पूर्व भागात जावा, काय स्मार्ट सिटी आहे हे समजेल़ फक्त ३ टक्के सोलापुरात स्मार्ट सिटी करता आणि वाहवा़़़ वाहवा करता, ही कोणती पद्धत़ वायफाय आणि हायफायवर काय पोटं भरत नाहीत अन् रस्ते होत नाहीत़ काय फायदा झाला, या स्मार्ट सिटीचा़ साधं शहरातील नागरिकांना नियमित पाणी देऊ शकत नाही अन् म्हणता सोलापूर स्मार्ट सिटी, असा घणाघाती आरोप आ. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात आ़ प्रणिती शिंदे भाजप सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली.
पुढे बोलताना आ़ प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात, राज्यात, महापालिकेत भाजपचीच सत्ता असताना त्यांना सोलापूरच्या विकासासाठी साधा निधी आणता आला नाही, ही शोकांतिका आहे़ स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे निकृष्ट पद्धतीची आहेत़ शहरात मागील काही दिवसांपासून फक्त वरवऱ़़ शोबाजीचे काम सुरू आहे़ भाजपचे नगरसेवक तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे भाजपला लोकांचे प्रश्न समजत नाहीत.
सोलापूर शहरातील विविध विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असणार आहे़ शहरात दररोज पाणीपुरवठा व्हावा, कामगारांचे प्रश्न सुटावेत, याकडे अधिक लक्ष असणार आहे़ सोलापुरात आयटी पार्क व्हावं, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत़ प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक व महत्त्वाची असते.
यंदाची निवडणूकही तशीच होती, पण एक चांगलं झालं की, धर्म, जात, भाषा यापेक्षा लोकांनी माझ्या आजवरच्या कामकाजावर विश्वास ठेवून मला निवडून दिल्याचंही शिंदे म्हणाल्या़ शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत तिसºयांदा कोणीच निवडून आलं नाही़ पण मी मतदारसंघात फिरले होते, माझा जवळपास सर्वांशी संपर्क झाला आणि मला मतदारांतून मिळत असलेला धीरच महत्त्वपूर्ण होता़ त्या आधारावरच मी विजयी होणार हे जाणून होते आणि सर्वांना मी विजयी होणार असा धीर दिला, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
स्मार्ट सिटी योजनेचे काम निकृष्ट़़...- स्मार्ट सिटी योजनेचे काम निकृष्ट पद्धतीचे झाले आहे़ रस्त्यांना आतापासून तडे जात आहेत, अनेक ठिकाणी पाणी साचत आहे़ सर्वच रस्ते खोदून ठेवले आहेत़ कामाचा वेग अजिबात दिसत नाही़ ३ टक्के भागामध्येच काम आणि संपूर्ण शहराची दुरवस्था याला स्मार्ट सिटी म्हणता येईल का, असाही सवाल आ़ प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला़ स्मार्ट सिटी नव्हे तर वाट लावलेली सिटी असं चित्र पुढे येत आहे़ दोन्ही मंत्र्यांनी भांडणाशिवाय काही केलं नाही...- देशात, राज्यात व महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही सोलापुरातील दोन्ही मंत्र्यांना सोलापूरच्या विकासकामांसाठी निधी आणता आला नाही़ दोन्हीही मंत्र्यांनी भांडणाशिवाय काहीही केलं नाही़ भाजप गटातटात विखुरला गेला आह़े पाण्याच्या विषयावर सुद्धा हे नगरसेवक एकत्र येत नाहीत, हे बरोबर नाही़ लोकांना आता कळून चुकलं आहे की आपण चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता दिली आहे़