करमाळा : भाजप-शिवसेना महाआघाडीचे उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नातेसंबंध असून, आ. जयकुमार गोरे यांनी आघाडीचा धर्म पाळण्याऐवजी भाजप-सेनेच्या उमेदवारास उघड पाठिंबा जाहीर केला आहे. असे असताना पृथ्वीराज चव्हाण काहीच कसे बोलत नाहीत, असा सवाल विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केला.
पोथरे (ता. करमाळा) येथे राष्ट्रवादीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी विलासराव घुमरे, संजय शिंदे, रश्मी बागल, दिग्विजय बागल, संजय पाटील-घाटणेकर, यशवंत शिंदे उपस्थित होते. यावेळी रश्मी बागल म्हणाल्या की, हे सरकार सहकार मोडीत काढून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करीत आहेत, असे सांगितले तर दिग्विजय बागल यांनी मांगी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांनी लोकप्रतिनिधीला मतदान केले नाही, म्हणून दुष्काळात पाण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप केला.
सांगोला तालुक्यातील अजनाळे येथेही रामराजेंची सभा झाली. यावेळी आ. गणपतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, प्रा. पी. सी. झपके, तानाजी पाटील, प्रा.नानासाहेब लिगाडे, सभापती डॉ. श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे आदी उपस्थित होते.