बावी पंचायतीच्या निवडणुकीत दुरंगी लढतीमध्ये पाटील- मोरे गटाचे नऊपैकी फक्त तीन सदस्य निवडून आले. मात्र, या गटाने आपल्या पॅनलचा पराभव होऊनही वचननाम्याप्रमाणे ग्रामस्थांना गहू व तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून जे कार्डधारक आहेत त्यांना मोफत देऊ, अशी घोषणा केली होती. त्याची पूर्तता करण्यास या गटाने सुरुवात केली आहे. हा खर्च पार्टीतील नेत्यांनी उचलून ही योजना ५ वर्षे चालवण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात स्वाभिमान बचत भवन येथे बुधवारपासून झाला. या कार्यक्रमास नूतन ग्रा.पं. सदस्य डी.एम. मोरे, अनिल मोरे, नंदकुमार मोरे व माजी सरपंच दशरथ तात्या मोरे, भारतनाना पाटील, सयाजीनाना पाटील, अप्पाराव माळी, पोपट मोरे, लक्ष्मण मोरे, औदुंबर पाटील, विजय पाटील, भालचंद्र पाटील, कल्याण मोरे, मोहन पाटील, बाळासाहेब मोरे, श्रीकांत पाटील, शरद मोरे, विजय दादा मोरे, दीपक मोरे, रतिलाल मोरे, नीलेशबापू पाटील, राजू मुलाणी, सिंधूबाई मोरे, सोलनकर, वाडीचे ग्रा.पं. सदस्य अतुल माळी, नागनाथ माळी आणि शिधापत्रिकाधारक उपस्थित होते. वाटपाचा शुभारंभ दशरथ तात्या मोरे यांचे हस्ते करण्यात आला.
कोट
आमच्या पॅनलचा पराभव झाला असला तरी आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या वचननाम्यात बावी गावातील शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना रेशन स्वस्त धान्य दुकानातून विकत घ्यावे लागत आहे, तो खर्च आम्ही पूर्ण पार्टीच्या वतीने पाच वर्षे मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची प्रत्यक्षात पूर्तता करत आहोत.
-डी.एम. मोरे, बावी ग्रामपंचायत सदस्य
----------
पाचवर्षाचा चार लाख खर्च उचलणार
बावी गावामध्ये एकूण १७१ शिधापत्रिकाधारक आहेत. पत्येकांना दर महिन्याला द्यावयाच्या रेशनच्या धान्यासाठी ६ हजार ८०० रुपये खर्च येतो. वर्षाला हाच खर्च ८१ हजार ६०० तर पाच वर्षाला ही रक्कम ४ लाख ८ हजाराच्या घरात जाते. लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती व्हावी या अनुषंगाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे सयाजीनाना पाटील यांनी सांगितले.