सोलापूर : सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आज नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते तृतीय पंथियांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सहायक आयुक्त कैलास आढे आदी उपस्थित होते.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण होत आहेत.यानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविकातून आढे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली. केंद्रीय जेष्ठ नागरिक कायदा 2007, राज्याचे सर्वसमावेशक जेष्ठ नागरिक धोरण 2013, जेष्ठ नागरिकांसाठी असणारे कायदे तसेच जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजनाबाबत माहिती दिली. तसेच तृतीयपंथीयांना शासकीय लाभ घेण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. समाज कल्याण विभागाच्या सहयोगाने त्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येत असलेबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमांतर्गत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाने राबविलेल्या लोकोपयोगी उपक्रम अहवालाचे प्रकाशन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्या छाया गाडेकर, संशोधन अधिकारी सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र बुजाडे, निरामय आरोग्यधामच्या अध्यक्ष सीमा किणीकर, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे, ज्येष्ठ नागरिक जिल्हास्तरीय समितीचे सदस्य महादेव माने यांच्या हस्ते करण्यात आले. वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांचा (80+ वयोगट) लोकशाही प्रक्रियेमध्ये दिलेल्या सहभागाबद्दल सत्कार करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त यांचे सहीचे इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील अभिनंदन पत्र सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. मान्यवराचे हस्ते तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर यांच्या कार्यालयाकडून जात वैधता प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन दत्तात्रय बनसोडे यांनी केले तर विशेष अधिकारी, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सुलोचना सोनावणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.