विषय तसा गंभीर आहे, परंतु जरा हटके मथळा दिसल्यावर वाचणारे अवाक् होऊन वाचतात म्हणूनच हा प्रपंच. गेल्या तीन-चार वर्षांपासून बºयाच अंशी कोरड्या पावसाला सामोरे जावे लागले. दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या. यंदा मात्र परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावून सोलापुरी पोशिंद्याला सुखावून सोडल्याने आनंदी आनंद वातावरण आहे.
परतीच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी यंदाही दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी स्थिती आपल्याला भेडसावत होती. त्याचवेळी माझ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. माझ्या वर्गासमोर तीन-चार फुटाचं एक बाळसं धरलेलं झाड आहे. रोज संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर दुसरीच्या वर्गातली एक मुलगी त्या झाडाजवळ वॉटर बॅग रिकामी करून जायची.
चार-पाच दिवस लक्ष देऊन मी तिच्या नित्यक्रमाचा निरीक्षण करत होतो, पण तिच्या या उपक्रमात काही खंड पडला नाही. न राहवून मी तिला जवळ बोलावून विचारलं, ‘अगं बाळा! तू रोज त्या झाडाजवळ वॉटर बॅगमधील पाणी का सांडतेस गं.’ ती सहज बोलून गेली, ‘शाळेतून घरी जाईपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे. वॉटर बॅगमधील पाणी रस्त्यावर सांडले की तसंच राहतं.’ ‘हो पण त्याने काय होतंय?’ माझ्या या प्रश्नाला उत्तर देताना ती बोलली, ‘सांडलेल्या पाण्यात कुणीतरी घाण पाय ठेवलं की रस्ता खराब होतो ना! त्या झाडाजवळ माती आहे ना, तिथे सांडल्यावर पाणी गडप होतं ना, म्हणून सांडते..’ बोलत बोलतच ती निघून गेली. या तिच्या बोलण्याचा प्रभाव मात्र माझ्या विचारांवर पडला. त्या छकुलीचे उत्तर जरी वेगळे असले तरी तिच्या आयडियाची कल्पना आपण इतर मुलांच्या डोक्यात घातली तर? मी थोडं डोकं खाजवून दुसºया दिवशी परिपाठावेळी त्या छकुलीच्या कल्पनेला आकार देण्याच्या विचारात गर्क झालो.दुसºया दिवशी परिपाठावेळी सर्व मुलांना सूचना केली, ‘आजपासून सर्व मुलांनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना बाटलीत किंवा वॉटर बॅगेत शिल्लक असलेलं पाणी आपापल्या वर्गासमोर लावलेल्या झाडाला ओता.’ मग काय अंमलबजावणी त्याच दिवसापासून सुरूही झाली.
सुरुवातीला एक-दोन, नंतर तीन्-चार आणि मग पुढे सर्वच मुले शाळा सुटल्यानंतर वॉटर बॅगमधील, बाटलीतील राहिलेले पाणी आपापल्या वर्गासमोर लावलेल्या झाडाला ओतून जाऊ लागली. सुकलेली, हिरमुसलेली रोपटी तग धरून राहिली, काही दिवसांनंतर त्या झाडांची दोन-चार फुटांनी उंचीही वाढलेली दिसून आली. मग काय मुलांमध्ये आणखी हुरूप आला व त्यांनी आपले कार्य जोमातच चालू ठेवले. काही दिवसांनी शाळेत चाललेली चिमुकल्यांची ही लुडबुड त्या छकुलीच्या लक्षात आली. कदाचित तिच्या लक्षात आलं असावं की, ‘आपल्याला सरांनी झाडाला पाणी ओतताना पाहिलं, काहीबाही विचारलं व इतरांनाही पाणी ओतायला लावलं. पण हे सारं माझ्यामुळेच घडलं ! ‘म्हणून की काय एकदा ती आपल्या मैत्रिणीला सहज म्हटली, ‘कशी वाटली आयडिया!’ आणि नेमकं हे मला ऐकायला आलं, पण मित्रहो तिची ही कल्पना मला तर आवडली हं! तुम्हालाही आवडेलच नक्की.. विचार काय करताय ‘राबवा तुम्हीही!’ मुलांनी आरंभलेला हा नवा अध्याय त्यांच्यासाठी मजेची बाब आहे, परंतु आपल्यासारख्या लोकांसाठी परिवर्तनाची नांदी आहे.- आनंद घोडके(लेखक झेडपी शाळेत शिक्षक आहेत.)