सोलापूर : कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे तेलंगी पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला. या दुकानदाराने गेल्या महिनाभरात बाहेरगावी प्रवास केला नसल्याचे कुटूंबीय सांगत आहेत. त्यामुळे त्यांना नेमकी कोणापासून कोरोनाची लागण झाली याचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. दक्षता म्हणून सोमवारी मृताच्या घरापासून एक किलोमीटर परिसरात घरांचे सर्वेक्षण केले जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी रात्री तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील रस्ते, काही इमारतींवर सोडियम हायपोक्लोराइटची फवारणी करुन घेतली. या पेठेकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. मृताचे कुटूंबीय, संपर्कात आलेल्या लोकांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी त्यांची तपासणी झाली. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी मिळणे अपेक्षित आहे.
मृत व्यक्ती एक महिन्यापासून आजारी होती. ते किराणा दुकान चालवित होते. २३ मार्चपासून पासून ते सोलापुराच आहेत. मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यांना नेमकी कोणापासून लागण झाली याचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. महापालिकेच्या ४० टीमच्या माध्यमातून तेलंग पाच्छा पेठ परिसरातील सात घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ज्या व्यक्तींना सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय त्यांची तपासणी केली जाणार आहे.