प्रत्येकाच्या ओठावर कधी ना कधी, नाव मोठं, लक्षण खोटं’ ही म्हण आलेलीच असते. नावात काय असते? असा प्रश्नही कुणाला पडतो तर कुणाला नावातच सगळे काही आहे, असं वाटतं. असो. ज्याचा त्याचा प्रश्न! पण ‘बडा घर, पोकळ वासा’ ही म्हण जशी अनुभवायला मिळते तसंच आहे या ‘नाव मोठं, लक्षण खोटं’ या म्हणीचंही!
अहो कसलं काय, अलीकडं तर नावही खोटं अन् लक्षणही खोटं’ असाच अनुभव येतोय या दुनियादारीत! काही माणसं उगीचंच आपण कुणीतरी मोठं अन् जगावेगळं आहे, असा गोड समज करून घेतात. आपले मोठेपण दुसºयानं मान्य करायला हवं की नको? जे नसतं ते कुणी कशाला मान्य करेल हो! मग काय, बळजबरीने स्वत:च हे मोठेपण हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात अनेक जण. आपल्याला लोकांनी मोठे म्हणावे म्हणून काहीही करायची तयारी असते बरं का या मंडळींची! ‘घरात नाही दाणा अन् मला प्रतिष्ठित म्हणा’ असंच काहीसं होतं हे सगळं! आता गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे काय तो वाघ होतो का हो? पाठीत एक काठी बसली की गाढवासारखेच ओरडणार ना! पण काही उपयोग नाही हो, खोट्या मोठेपणाची झूल पांघरून मिरवतातच ही नकली मंडळी.
हल्ली काय होतंय, ज्यांच्याकडे पैसा आहे तो आपोआपच तथाकथित ‘प्रतिष्ठित’ म्हणून गणला जातोय. अर्थात ही प्रतिष्ठा नकली असते हे लोक जाणतात पण ‘तो’ मात्र या विश्वात रमलेला असतो. तसं पाहिलं तर कुणी मोठं नसतं अन् कुणी छोटं नसतं हो या दुनियादारीत. खरीखुरी प्रतिष्ठा असणारे अगणित सज्जन आहेत या दुनियादारीत. कोणताही कार्यक्रम बघा, उपस्थित मान्यवर अन् प्रतिष्ठित असे शब्द हमखास ऐकायला मिळतात. स्वत:च स्वत:च्या नावाला ‘माननीय’ असं बिरुद चिकटवणारेही हमखास पाहायला मिळतात. कार्यक्रम पत्रिकेत पाहुण्यांच्या नावाला मा. अमुक तमुक असं म्हणणं ठीक आहे हो, पण आयोजकही आपल्या नावामागं माननीय असं आवर्जून छापून घेतो.
एखाद्या पदावरून पायउतार झाल्यावरही नावापुढे ‘मा. अध्यक्ष’ असं छापलं जातं. ‘माजी’ म्हणवून घ्यायला जरा कसंतरीच वाटतं ना! खोट्या प्रतिष्ठेचा हा बुरखाच नाही का हो? बरं नुसतं ‘मा.’ एवढं लिहीलं तर या मा.चे काढू तेवढे अर्थ निघतील ना!
मला आठवतंय, एक व्यक्ती स्वत: एकटाच प्रसारमाध्यमाच्या कार्यालयात येत होता. तिथलेच कागद मागून स्वत:च्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाºया जाहिराती स्वत:च लिहीत होता अन् स्वत:च्या नावापुढे उगवतं नेतृत्व, गरिबांचा कनवाळू असलं सगळे लिहीत होता. या जाहिराती अन् पैसे देऊन मोठ्या समाधानानं तो बाहेर पडत होता. प्रतिष्ठेसाठी काय काय करतात लोक या दुनियादारीत! एकदा माझ्या एका मित्राची गाडी बंद पडली. रिक्षाचा आधार घ्यावा लागला. हा तथाकथित प्रतिष्ठित रिक्षात बसला खरा, पण रुमालानं तोंड लपवत होता. मी विचारलं तर म्हणाला, ‘रिक्षात बसणे माझ्या प्रतिष्ठेला शोभत नाही हो!’ काय बोलावं? तथाकथित प्रतिष्ठेचा हा खेळच न्यारा आहे हो!
दुसºयांची कुचेष्टा करून स्वत:ची प्रतिष्ठा वाढत नसते कधी. पण, अनेक जण हा उद्योग करीत असतातच. दुसºया जातीतल्या जोडीदाराशी लग्न केल्यानं तर आजच्या काळातही ‘भूकंप’ होतोय! म्हणे, प्रतिष्ठेला धक्का बसतो! या कथित प्रतिष्ठेसाठी पोटच्या गोळ्याचाही जीव घेतले जातात राव! परवाच नाही का, मंगळवेढा तालुक्यात एका डॉक्टर मुलीचा प्राण अशा प्रतिष्ठेनं घेतला. शेतातल्या सालगड्याच्या मुलाशी लग्न केले म्हणून आई-बापांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली म्हणे! समस्तीपूर (बिहार) येथील पासष्ट वर्षे वयाच्या रोशनलालनं चक्क एकवीस वर्षीय भावी सुनेसोबतच लग्न केलं. कारण काय तर म्हणे प्रतिष्ठा! समाजात असलेली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी आपण भावी सुनेशी लग्न केल्याचं हे आजोबा सांगायला लागले. मंडपातून मुलगा ऐनवेळी पळून गेला म्हणून जात असलेली प्रतिष्ठा म्हातारपणी बोहल्यावर चढल्यावर परत येते तरी कशी? कोण कसा विचार करेल हे खरंच नाही बुवा सांगता येत. प्रतिष्ठेसाठी काहीही करायची तयारी, पण अशावेळी यांना विचारावंच लागतं, ‘प्रतिष्ठा म्हणजे काय रं भाऊ?’ -अशोक गोडगे-कदम(लेखक हे साहित्यिक आहेत.)