सिव्हिलच्या डॉक्टरांवर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांना काय अधिकार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:49 AM2018-11-28T10:49:01+5:302018-11-28T10:51:51+5:30
काँग्रेसचे आव्हान: अहवालाची प्रतीक्षा
सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार आरोग्यमंत्रीविजयकुमार देशमुख यांना आहेत काय, हिंमत असेल तर त्यांनी डॉक्टरांवर कारवाई करून दाखवावेच, असे आव्हान काँग्रेसचे नगरसेवक बाबुमियाँ मिस्त्री यांनी दिले आहे.
स्वाईन फ्लूने मरण पावलेल्या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी नकार दिला होता. याबाबत भाजपचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी डॉक्टरांना विनंती केली होती. त्यावर डॉक्टरांनी रात्री शवविच्छेदन करता येत नाही असा नियम सांगितला होता. त्यावर पाटील यांनी आरोग्य तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी संपर्क साधला होता. डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमानुसार दुसºया दिवशी सकाळीच शवविच्छेदन करा असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला. त्यामुळे पाटील यांचा नाईलाज झाला. अशी स्थिती असताना नगरसेवक बाबुमियाँ मिस्त्री यांनी पुढाकार घेऊन त्या दिवशी रात्रीच शवविच्छेदन उरकले. ही बाब उघड झाल्यावर पाटील संतप्त झाले. सभागृहनेते संजय कोळी यांना संपर्क साधून त्यांनी घडल्याप्रकाराबाबत माहिती दिली. त्यावर कोळी यांनी संबंधित डॉक्टरांना फैलावर घेतले होते तर राजकुमार पाटील यांनी अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रार केली.
यावर अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. समितीची चौकशी प्रलंबित असताना या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेवक मिस्त्री यांनी डॉक्टरांच्या कामाला प्रमाणपत्र देत आरोग्यमंत्र्यांच्या अधिकारास चॅलेंज दिले. देशमुख यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य खाते आहे. सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय विभागात मोडते. त्यामुळे सिव्हिलच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार देशमुख यांना नाहीत असे स्पष्टीकरण केले आहे. त्यामुळे ते डॉक्टर निश्चिंत असल्याची खात्री मिस्त्री यांनी दिली.
मग डॉक्टरांची वकिली कशासाठी
नगरसेवक मिस्त्री यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तक्रारदार पाटील म्हणाले की, देशमुख यांच्याकडे सार्वजनिक आरोग्यमंत्रीपद असले तरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सर्व खात्यांची जबाबदारी आहे. जर त्यांना अधिकार नसतील तर संबंधित डॉक्टरांना घेऊन मिस्त्री पालकमंत्र्यांच्या घरी वकिली करण्यासाठी का आले होते, असा सवाल केला.
अहवालाकडे लक्ष
- तक्रारदार राजकुमार पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांची भेट घेऊन तक्रारीचे पुढे काय झाले याबाबत चौकशी केली. त्यावर डॉ. घाटे यांनी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. दोन दिवसात अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवालानंतर पुढे काय करायचे हे निश्चित केले जाईल, असे डॉ. घाटे यांनी स्पष्ट केले.