यशवंत सादूल
सोलापूर : गुबू ....गुबू ...असा आवाज सांग सांग बळीराम पाऊस पडेल का? अशी विचारणा करत फिरणाºया नंदीवाल्यांचा समूह टिळक चौक परिसरात गुरुवारी सकाळी दिसून आला. यांच्यासोबत असलेला हा नंदीबैल आपल्या अर्धवर्तुळाकार, वैशिष्ट्यपूर्ण शिंगामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. सहा ते सात इंच जाडीच्या या शिंगांनी अडीच ते तीन फूट वळण घेत डोक्याच्या मधोमध एका लयीत एकत्र आलेली होती. बावीस वर्षांच्या या बळीराम नंदीबैलाने गुरुवारी सोलापुरात हजेरी लावली होती. नंदीसोबत असलेल्या अनिकेत गोंडे, राजेंद्र भिसे, गणेश गोंडे, कुंडलिक भिसे हे नंदीवाले सांग.. सांग बळीराम... पाऊस पडेल का? अशी विचारणा करीत असता त्यास तो मान हलवून साद देत होता.
चाटी गल्ली, मंगळवार पेठ परिसरात गुरुवारी सकाळी आपल्या भलेलठ्ठ शिंगांच्या, धिप्पाड नंदीसोबत गुबू.. गुबू.. वाजवीत निघालेला नंदीवाल्यांचा समूह. प्रत्येक घरासमोर येताच आपल्या नंदीशी संवाद साधत लोकांचे लक्ष केंद्रित करत होते. घरातील मंडळी नंदीची आरती करून, पोळी, गूळ, चपाती, तांदूळ व त्यासोबत दक्षिणाही देत होती. चहा प्यायला, दूध प्यायला आलो.. जेवायला नाही. तांदूळ, गूळ, पोळी खायला आलो.
कोणी चपाती दिली का? कोणी तांदूळ दिला का बळीराम? असे नंदीला विचारले असता तो नकारार्थी मान हलवतो. मुंडके हलवून खायला मागतोय नंदीबाबा, खाऊ घाला हो याला, अशी साद घालताच गल्लीतील महिला गूळ, चपाती व इतर अन्न घेऊन येतात. नंदीला गंध लावून, औक्षण करून खाऊ घातले जाते. नंदीवाल्यांना दक्षिणा देत असल्याचे चित्र टिळक चौक परिसरात दिसून आले. बळीरामाची परिक्रमा बीडच्या औंढा नागनाथ येथून सुरू होऊन अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांचे दर्शन करून शहरात एक-दोन दिवस मुक्काम करून पंढरपूरला रवाना होते. आषाढी वारीनंतर कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी जातात. त्यानंतर परत बीडला जातात.
औक्षण करणाºया महिलेला उद्देशून तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्ही पाच बहिणी, तुम्हाला एक नणंद आहे, दोन भाऊ आहेत, तुमच्या दिराचे लग्न झाले पण त्यांना मुलगा नाही. दोन्ही मुलीच... खरं आहे की नाही, असे विचारताच ती महिला आश्चर्यचकित होऊन होकार देते. पुढे नंदीवाले म्हणतात, तुमच्या मिस्टरांच्या व्यवसायात अडथळे आहेत. तुमचा मुलगा तुमचे नाव उज्ज्वल करणार आहे. तुमच्या आईवडिलांचे अफाट प्रेम मिळाले, पण वडील सध्या हयात नाहीत, सासू-सासरेसुद्धा यात नाहीत बरोबर आहे का? अशी विचारणा करीत तुम्हाला २०१९ साल सुखसमृद्धीचे जाणार आहे.
आम्हाला काहीच अपेक्षा नाही, नंदीला गूळ, चपाती द्या, आम्हाला दक्षिणा द्या, असे म्हणत पुढच्या घरी जात होते़़
अनेक चित्रपटात गाजलेला नंदी बळीराम
- बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बावीस वर्षांचा हा बळीराम बापू बिरू वाटेगावकर, अजंठा या सारख्या मराठी चित्रपटांसह जान, अजय या हिंदी चित्रपटातील भूमिकेमुळे गाजला.
- बळीराम हा नंदीबैल राजस्थानी काँकरेज जातीचा असून त्याची लांबी सहा फूट असून उंची साडेपाच फूट आहे, वजन सातशे किलो आहे. त्याची शिंगे अर्धवर्तुळाकार तीन फुटांच्या जवळपास आहेत तर त्यांची जाडी सहा ते सात इंच आहे. बळीराम नंदीला दिवसभर घरोघरी भक्तांकडून चपाती, भाकरी, तांदूळ, गूळ आदी ३० ते ४० किलो अन्न मिळते. रात्री मात्र २५ ते ३० किलो गवत दिले जाते.