विजय विजापुरे
बºहाणपूर : मला चांगले प्रशिक्षक व फायबरचे पोल, मॅट मिळाले तर मी राष्ट्रीय स्तरावर नक्कीच पदक जिंकून दाखवेन, असा विश्वास आहे़ पण माझ्याकडे खेळाचे साहित्य नसल्याने सराव बंद आहे. सध्या केवळ धावण्याचाच सराव करीत आहे़ शिवाय शेतात महिलांसोबत काम करीत असल्याचे महाराष्ट्र चॅम्पियन खेळाडू नागम्मा बजे सांगत होती.
सदलापूर (ता. अक्कलकोट) येथील नागम्मा बजे ही सामान्य कुटुंबातील मुलगी. आई गावात चहाची टपरी चालवते तर वडील शेतीची कामे करतात. प्रतिकूल परिस्थितीची जाणीव ठेवून नागम्माने गावात कन्नड माध्यमातील प्राथमिकचे शिक्षण पूर्ण केले़ तिच्या खेळातील नैपुण्य हेरून शिक्षकांनी बांबू उडी या खेळप्रकाराचे मार्गदर्शन सुरू केले.
शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार नागम्माने आपली खेळातील चमक दाखवित तालुका, जिल्हा, विभागीय स्पर्धेत यश मिळविले़ विशेष म्हणजे सलग तीन वर्षे राज्यस्तरावरील नागपूर, कराड व सातारा येथील स्पर्धेत प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावले आहेत.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या युवी सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०१८, २०१९-२०२० मधील १७ वर्षे वयोगटातील बांबू उडी क्रीडाप्रकारात नैपुण्य प्राप्त केल्यानंतर नागम्माची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
राष्ट्रीयस्तरावरील सामन्यापूर्वी जी तयारी प्रशिक्षकांकडून केली जाते, ती नागम्माकडून झाली नाही. मात्र निराश न होता नागम्माने सराव सुरू ठेवला. अपार कष्टाच्या जोरावर नागम्माने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पहिल्या सहा जणांमध्ये आपला क्रमांक राखला हे विशेष!
बांबू उडी व पोल व्हॉल्डसाठी महाराष्ट्राबाहेर खेळताना खेळाडू फायबर पोल व जमिनीवर मॅटचा वापर करतात. महाराष्ट्राबाहेर बांबू वापरण्यास परवानगी मिळत नाही. माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मला फायबर पोल घेणे शक्य नाही. शाळा बंद असल्याने सरावासाठी मार्गदर्शन व फायबर पोल, मॅटची अत्यंत गरज आहे.
- नागम्मा बजे
महिला मजुरांसोबत शेतात काम लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत़ शिवाय माझा सरावही सुरू नाही़ केवळ रनिंग करते़ सततच्या पावसामुळे शेतात तण वाढले आहे़ ते काढण्यासाठी महिला मजुरांसोबत खुरपणीचे काम करीत असल्याचे नागम्मा हिने सांगितले़