केंद्र सरकारने धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांवर विशेष लक्ष दिले आहे. सोलापूरवरून अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. सहा वर्षांपूर्वी धार्मिक स्थळांना जोडणारे हे रस्ते चौपदरी करण्याचा निर्णय झाला. त्यांचे कामही तातडीने हाती घेण्यात आले. अवघ्या अडीच वर्षात सोलापूर ते अक्कलकोट हा चौपदरी सिमेंट रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर आला आहे. मात्र अद्याप महत्त्वाचे पूल बांधकाम रखडले आहे. रस्त्यांच्या कामात प्रगती होत असली, तरी उड्डाणपूल, वळण रस्ते, जोडरस्ते, छोटे-मोठे पूल, भुयारी मार्ग ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही आणि टोल वसुलीची इतकी घाई का, असा प्रश्नल साहजिकच विचारला जात आहे.
सोलापूर आणि कुंभारी दरम्यान कुंभारीपासून एक किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जुना टोल सुरू आहे. याठिकाणी टोल प्लाझाची उभारणी केली नाही, तरीही टोल आकारला जातो. टोल सुरू झाल्यापासून स्थानिकांचा विरोध आहेच. सोलापूर शहराजवळ असल्याने अनेकवेळा नागरिकांना शहरात जावे लागते. शेतीच्या कामासाठी बरीच मंडळी वाहनातून गावाकडे येतात. त्यांना जाता-येता दोन्हीवेळेला टोल भरावा लागतो. याबाबतचा संताप कुंभारी टोल सुरू होताना व्यक्त करण्यात आला होता. आता वळसंगजवळ नवा टोल सुरू झाल्याने स्थानिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
-------
समन्वय नाही म्हणून भुर्दंड
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कुंभारी येथे टोल सुरू आहे. नव्या रस्त्याच्या बांधणीनंतर हा टोल नाका बंद होण्याची अपेक्षा होती. दोन टोलमधील किमान अंतर ४० किलोमीटरपेक्षा अधिक नसेल, हा नियम आहे. मात्र, कुंभारीचा टोल सुरू असताना वळसंग टोल सुरू करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा नवीन टोल आहे. नवा टोल सुरू करताना जुना बंद झाला पाहिजे, यावर दोन्ही विभागांचे एकमत आहे. तरीही त्यांच्यात समन्वय नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
-------
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा कुंभारी येथील टोल बंद करण्याचा आदेश संबंधित विभागाला देण्यात आला आहे. वळसंगचा टोल सुरू होण्यापूर्वी तो बंद होण्याची गरज आहे. तसा आदेश आल्याशिवाय बंद करता येत नाही. वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.
- अनिल विपत, परिचलन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
................
प्रशासनाच्या भोंगळपणाचा फटका नागरिकांना बसतो. यात चूक नसताना अकारण गरीब जनतेला आर्थिक बोजा सहन करावा लागतो. कुंभारीचा टोल बंद व्हायला हवा. अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केल्याचा हा परिणाम आहे.
- कृष्णात पवार, सामाजिक कार्यकर्ता, कर्देहळ्ळी