मंगळवेढा : विना मास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वाररावर कारवाई करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास आम्ही दंड भरणार नाही, माझी मोटरसायकल अडवायचा काय संबंध, तुला माहिती नाही आम्ही कोण? दोनच मिनिटात तुझी नोकरी घालवतो अशी धमकी देत अंगावर धावून गेल्याप्रकरणी सरकोलीच्या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी सणाच्या तोंडावर सोशल डिस्टन्स पालन व्हावे व कोरोनाची साखळी नियंत्रित व्हावी म्हणून शासनाने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यानुसार तसे आदेश दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी हे आपल्या पथकानुसार विना मास्क दुचाकीवर जाणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात थांबले असता गणेश रामहरी भोसले, जगदीश रामहरी भोसले हे (दोघे रा.सरकोली) यांच्या मालकीची दुचाकी एमएच १३ डीएच २३१५ वरून जात असताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी विना मास्क असल्यामुळे पाचशे रुपये दंड केला असता त्यांनी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे करीत आहेत.