सोलापूर : समांतर जलवाहिनीच्या बैठकीसाठी भाजपच्या दोन देशमुखांना का निमंत्रित केले नाही, असा सवाल भाजपचे सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांचे इथे काय काम, त्यांना उपस्थित राहायचे होते तर घरूनच व्हीसीद्वारे उपस्थित राहू शकले असते. इथे राजकारण करू नका. तुम्ही सभागृहात एवढे कसे जमले? तुमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगेन, अशा शब्दांत अजितदादांनी सभागृह नेत्याला तंबी दिली. यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या प्रलंबित कामांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी मुंबईतून व्हीसीद्वारे बैठक घेतली. जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक महेश कोठे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, किसन जाधव आदींनी या बैठकीत सहभाग नोंदविला.
बैठकीच्या सुरुवातीला अजित पवारांनी लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. सोलापुरात आठ दिवसाआड पाणी येते. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम करणे आवश्यक आहे. भूसंपादनाचे पैसे देण्याची पालिकेची क्षमता नाही. शासनाने पैसे द्यावेत, अशी मागणी आनंद चंदनशिवे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी केली. महापौर यन्नम यांनीही निधीसाठी आग्रह धरला. यादरम्यान अजितदादांनी जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा साधला. तुमची कामगिरी एकदम बेकार सुरू आहे. भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटींवरून १३० कोटींवर गेलीच कशी, याची चौकशी करा. मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर यांची एक समिती करून अहवाल पाठवा. आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत नगरसेवकांसह अनेक अधिकारी एकत्र होते. यावरही अजितदादा संतापले. त्यात करली यांनी देशमुखांचा प्रश्न विचारल्यानंतर ते अधिकच भडकले. देशमुखांना वगळून या बैठकीत महेश कोठे यांना निमंत्रण देण्यात आले होते. कोठे यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
...तर १० महिन्यांत काम पूर्ण करू
समांतर जलवाहिनीचे टेंडर ऑगस्ट २०१९ मध्ये झाले. काम पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी होता. आता २० महिने झाले. उर्वरित १० महिन्यांत काम पूर्ण होईल का, असा सवाल अजितदादांनी स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांना विचारला. भूसंपादन झाले तर आम्ही वेळेत काम करू, असे ढेंगळे-पाटील म्हणाले.
जॅकवेलच्या जागेसाठी पुन्हा बैठक
उजनी धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी जलसंपदा विभागाने जागा दिलेली नाही. मनपाकडे पाणीपट्टीचे येणे बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा मुंबईत बैठक घेऊ, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
...तर आयुक्तांविरोधात ठराव करा
मनपा आयुक्त पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांना किंमत देत नाहीत, अशी तक्रार महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली. तुमचे ऐकत नसतील तर काय उपयोग? ऐकत नसतील तर सभागृहात अविश्वास ठराव आणा. आम्ही तो मंजूर करून आयुक्तांना परत बोलावू, असे अजितदादांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांबद्दलही नाराजी
समांतर जलवाहिनीच्या भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटी निश्चित केली होती. मात्र माढ्यातील राजकीय नेत्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन वाढवून घेतले. आता ही रक्कम १३० कोटी रुपयांवर गेली आहे. मूल्यांकन कसे वाढले याची चौकशी करावी, असे आदेश अजितदादांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लवकरच अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले.