सोलापूर - सरकारी अधिकारी म्हटलं की रुबाब, रुतबा आणि त्यांची भेट घेण्यासाठी वेट अँड वॉच असंच काहीतरी असतं. मात्र, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कृतीतून वेगळाचा आदर्श निर्माण केलाय. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी चक्क कार्यालयातून बाहेर येत गाडीपर्यंत येऊन 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीची समस्या ऐकून घेतली. तसेच, त्यांचे समस्येच निराकरण करण्याचंही सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशीलतेमुळे वृद्ध देशमुख काकाही भारावले.
सोलापूर शहरातील ज्येष्ठ वकील चंद्रकांत देशमुख यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त धाव घेतली. आपल्या पत्नीसह ते गाडीने काही कामानिमित्त सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना प्रत्यक्ष भेटून आपली समस्या त्यांच्या कानावर घालायची होती. पण, पहिल्या मजल्यावरील जिल्हाधिकारी यांच्या दालनांत जावे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. याबाबत कार्यालयात बसलेल्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसलेंना कळाले. त्यानंतर, क्षणाचाही विलंब न करता किंवा देशमुख यांना ताटकळत न बसवता, देशमुख यांची समस्या समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी भोसलेच दालन सोडून खाली आले. भोसले यांनी देशमुख यांची समस्या समजून घेऊन लवकरच समस्या निराकरण केली जाईल, असे आश्वासनही दिले. जिल्हाधिकारी भोसलेंच्या या वागणुकीने वृद्ध देशमुख आणि त्यांच्या पत्नी भारावून गेल्या. एका आयएएस अधिकाऱ्याकडून मिळालेला हा सुखद धक्का देशमुख दाम्पत्यांना आनंद देऊन गेला.
जिल्हाधिकारी भोसले यांची संवेदनशीलता अनेकांनी भावली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर, जिल्ह्यातील सोशल मीडियावर भोसले यांचं कौतुक करत ही पोस्ट व्हायरल होत आहे.