राजकुमार सारोळे
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर महाराज येऊ दे, नाहीतर आणखी कोणी पॉवरफुल्ल. लोकसभेचे निवडणूक रणांगण मला नवीन नाही. युद्धभूमीत कोण येतो, कोण जातो, सामना तर करायला लागतोच, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
काँग्रेसतर्फे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरात आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी ‘जनवात्सल्य’ या त्यांच्या निवासस्थानी शिंदे यांच्याशी संवाद साधला. भाजपतर्फे विरोधात नवा चेहरा आणला जात आहे, यावर प्रतिक्रिया विचारल्यावर शिंदे म्हणाले की, निवडणूक ही एकप्रकारची युद्धभूमीच आहे. त्यात समोर कोण येतो याचा विचार न करता सामना करायची तयारी लागतेच.
गेल्या निवडणुकीसारखा मी आता गाफील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील जाहीर सभेत यंत्रमागाचे उदाहरण दिले होते. टेक्स्टाईल इंडस्ट्री इतकी मोठी असताना शिंदे यांनी काय केले अशी टीका त्यांनी केली होती. हम करेंगे असे आश्वासन देऊन साडेचार वर्षांत एक मीटर कापड खरेदी केलेले नाही. मोदींची आश्वासने फेल गेली आहेत.
प्रकाश आंबेडकरांच्या धोरणात बसते का?च्बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती, त्याचा परिणाम होईल का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, कोणी कुठे लढावे हा त्यांचा प्रश्न आहे. बहुजन वंचित आघाडीची काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या चर्चेच्या एका बैठकीला मीही उपस्थित होतो. पण त्यांच्या मागण्या मोठ्या होत्या. पक्षाला बाजूला सारून या मागण्या पूर्ण करणे अशक्य होते. पण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची भारतीय राज्यघटना लिहिली, घटनेचा ढाचा निधर्मी आहे, असे असताना बहुजन वंचित आघाडीने जातीयवादी शक्तीबरोबर आघाडी केली आहे, हे प्रकाश आंबेडकर यांच्या सूत्रात बसते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आडम पूर्वीची मदत विसरले का?- माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केंद्रात माकपची काँग्रेसबरोबर आघाडी झाली तरी सोलापुरात शहर मध्य विधानसभेची जागा शिंदे यांनी सोडल्याशिवाय मी मदत करणार नाही, असे वक्तव्य केल्याचे निदर्शनाला आणल्यावर शिंदे म्हणाले की, या विषयावर आडम माझ्याशी बोललेले नाहीत. यापूर्वी मी त्यांना मदत केली आहे. मोठा आग्रह करून प्रकाश यलगुलवार यांची उमेदवारी काढून त्यांना निवडून आणल्याचे विसरले आहेत.
राजकारणात होतं असं कधी कधी- माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माघार का घेतली, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, निश्चित कारण मला नाही सांगता येणार. पण राजकारणात असं होतं कधी कधी. प्रत्येकाच्या सोयीचा प्रश्न असतो. त्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावे लागतात. माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडझडीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, मी इतकी वर्षे पाहत आलो आहे. निवडणुका आल्या की पळापळ होते अन् नंतर पश्चात्ताप झाला की आपोआप घरी येतात. त्याचं इतकं टेन्शन घेण्याचे कारण नाही.