सोलापूर : ४० फूट उंचावर पिंपळाच्या झाडावर मांजामध्ये अडकलेल्या कावळ्याची अॅनिमल राहत, महापालिका आणि अग्निशामक दलाच्या मदतीने सुटका करण्यात आली़ सुरक्षित खाली येताच तेवढ्याच ताकदीने तो हवेत झेपावला़ यावेळी प्राणिमित्रांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.
सोमवारी सकाळी सम्राट चौकात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ एका पिंपळाच्या झाडावर मांजामध्ये कावळा अडकल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले़ येथील एक तरुण विशाल कांबळे याने अॅनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली़ अॅनिमल राहतचे आणखी एक सदस्य अजित मोटे आणि डॉ़ आकाश जाधव हे दोघे घटनास्थळी पोहोचले़ अॅनिमल राहत आणि अग्निशामकचे कार्यकर्ते या बास्केट गाडीत बसून कावळ्यापर्यंत पोहोचले़ अडकलेल्या मांजासह कावळ्याला खाली घेतले आणि दोरा कापून त्याला बाहेर काढले़ तो जखमी नव्हता, मात्र अत्यवस्थ होता़ अजित मोटे यांनी त्याच्यावर उपचार केले़ त्याला ऊर्जा मिळाली, पंखात बळ आले़ उपचार करणाºयांकडे पाहत त्याने हवेत झेप घेतली.
बास्केट व्हॅनची मदत...- कावळा खूपच उंचीवर फसल्याचे निदर्शनास आले़ यावेळी अॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले़ मात्र त्यांची शिडी तिथपर्यंत पोहोचत नव्हती, त्यामुळे त्याची सुटका करण्यात अडथळे येत होते़ खूप प्रयत्न करून या तरुणांनी महापालिकेच्या विद्युत विभागाचे परदेशी यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी शहरातील पथदिवे दुरुस्त करण्यासाठी वापरली जाणारी बास्केट गाडी पाठवून दिली.