संभाजी मोटे
वाळूज : मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे भोगावती व नागझरी या दोन नद्यांचा संगम झालेला आहे़ पावसाळ्यात या दोन्ही नद्यांना पाणी आले की शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून पोहोत जाऊन शाळा गाठावी लागते.
सध्या दमदार पावसामुळे भोगावती आणि नागझरी नदीला पाणी आले आहे. वाळूज गावच्या पूर्वेला नदीच्या पलीकडे २०० लोकांची जाधव वस्ती आहे़ येथील शाळकरी मुलांना, शेतकरी आणि महिला यांना गावात येण्यासाठी दररोज नदीतून कपडे भिजवत वाट काढावी लागत आहे. काही वेळेला नदीपात्राची खोली कळत नाही़ अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून वाट काढत जावे लागत आहे़ या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी सातत्याने होत असून, ती पूर्ण करण्याची मागणी केली.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली़ परंतु या नदीवर आणखीन पूल झाला नाही. त्यामुळे नदीला पाणी आल्यावर आमचा गावाशी संपर्क होत नाही. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी येथील नागरिकांना २० कि.मी. अंतरावरून वाळूजला यावे लागते. नदीला पाणी येऊन आज पंधरा दिवस झाले. शाळकरी मुलांना दररोज कपडे भिजवत जावे लागते. कधी-कधी पाऊस वाढताच नदीला पूरस्थिती उद्भवते़ अशावेळी गाव आणि वस्ती यांचा संपर्क तुटतो़ पाणी ओसरेपर्यंत वस्तीचा गावाशी संपर्क होत नाही.
पाणी जास्त असल्यास धोका होण्याचा संभव आहे. गावांचा निम्मा शिवार नदीच्या पलीकडे आहे. आता पेरणीचा हंगाम चालू आहे. पाण्यातून साहित्य नेताना शेतकºयांचे हाल होत आहेत़ आजपर्यंत कितीतरी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, परंतु प्रत्येकाने नुसती आश्वासने दिल्याचे नागरिक सुभाष जाधव, धनाजी मोटे, राजेंद्र मोटे, मारुती कादे, तुकाराम कादे यांनी सांगितले़ लवकरात लवकर या नदीवर पूल उभारण्याची मागणी होत आहे.
ओल्या कपड्यावर बसावे लागते शाळेतपावसाळ्यात कधी कधी भोगावती व नागझरी नद्यांना पाणी येते़ त्यामुळे गावचा संपर्क तुटतो़ दोन-दोन महिने पाणीपातळी खाली येत नाही़ अशा वेळी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता काढावा लागतो तर काहींना पोहूनच नदी पार करून शाळा गाठावी लागते़ पोहून आल्याने सर्व कपडे भिजलेले असतात़ या ओल्या कपड्यांनी शाळेत बसून ज्ञानार्जन करावे लागते़ पावसाळ्यात तर ढगाळ वातावरणामुळे कपडे वाळत नाहीत़ दिवसभर अंगावरील कपडे ओलेचे असतात़ त्यामुळे आजारी पडण्याचा धोका विद्यार्थ्यांना असतो़