सोलापूर : जून ते ऑक्टोबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे यातून ५ लाख ७ हजार ३१९ शेतकरी बाधित झाले. या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून पहिल्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला २९४ कोटी ८१ लाखांची मदत मिळाली. यात शेती पिकांच्या नुकसानीपोटी २ लाख ६६ हजार ६८६ शेतकऱ्यांना २४८ कोटी ४२ लाख इतकी मदत वाटप करण्यात आली. दुसऱ्या हप्त्यात २५३ कोटी अनुदानाची प्रतीक्षा आहे. २ लाख ४० हजार ६३३ शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे दुसरा हप्ता कधी? असा सवाल तब्बल अडीच लाख शेतकरी विचारताहेत.
जिरायत-बागायत बाधित क्षेत्राकरिता प्रतिहेक्टर १० हजार तसेच बहुवार्षिक पिकांकरिता प्रतिहेक्टर करिता २५ हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली. त्यानुसार मदत निधीचे वाटप झाले.
यावर्षी सर्वाधिक अतिवृष्टी ऑक्टोबरमध्ये झाली. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार हेक्टर बागायत पीक क्षेत्र बाधित झाले. यामुळे २ लाख १० हजार शेतकऱ्यांना फटका बसला. बाधित बागायत क्षेत्राकरिता २१४ कोटींची मदत शासनाकडे मागण्यात आली. एक लाख ४९ हजार हेक्टर जिराईत क्षेत्र पुरामुळे बाधित झाले. याचा एक लाख ८१ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. याकरिता १९१ कोटींची मदत मागण्यात आली. पुरामुळे ७३ हजार फळबाग क्षेत्र बाधित झाले. याचा ९२ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. याकरिता १३२ कोटींची मदत मागण्यात आली होती.
शेतकऱ्यांमधून चिंता
दिवाळीपूर्वी राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. २९४ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा देखील झाले. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु वाटप प्रक्रिया लांबली. त्यामुळे ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना दिवाळीनंतर पहिल्या आठवड्यात अनुदान मिळाले. आणखीन तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे या वर्षाअखेर अनुदान मिळणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.