अक्कलकोट : कर्नाटकातील पाहुण्यांकडून आठ हजार रुपये घेऊन पाचशे रुपयांची पावती दिल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक डॉ. तेजस्वी सातपुते यांनी दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. डीवायएसपी गायकवाड यांनी तपास करून अहवाल सादर केला. या घटनेला महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही. ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल तक्रारदारासह नागरिकांतून उपस्थित होत आहे.
२४ एप्रिलला कर्नाटकात माशाळ (ता. अफझलपूर) येथून काही पाहुणे मंडळी अक्कलकोट येथे निधन झालेल्या एका कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. भेटून परत जाताना अक्कलकोट बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक पोलीस कर्मचारी शेख यांनी अडविले. त्यांनी त्यांच्याकडून आठ हजार रुपये घेऊन केवळ पाचशे रुपयांची पावती दिली होती. तीही खाडाखोड झालेली. याबाबत २६ एप्रिलला ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. सातपुते यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर डॉ. गायकवाड यांनी संबंधित तक्रारदार यांना कर्नाटकातून बोलावून जबाब घेतले तसेच पोलीस जीप चालकाकडून घटनेची माहिती घेतली. याबाबत डाॅ. गायकवाड यांनी त्या प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे. याबाबत सिद्धाराम अनिलप्पा वामोरे यांनी तक्रार दिली होती.
---
घटनेच्या चौकशीसाठी पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी २६ एप्रिलला जबाब देण्याकरिता कार्यालयात बोलावले होते. रकमेची केलेली मागणी, दिलेली रक्कम, एटीएमपर्यंत पोलीस गाडीत घेऊन गेले या सर्व घटनांची माहिती तपास अधिकारी यांना दिली आहे. त्यानंतर या घटनेचे काय झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलीस अधीक्षकांवर पूर्ण विश्वास आहे. अजूनही कारवाईच्या प्रतीक्षेत आहे.
- सिद्धाराम वामोरे, तक्रारदार, माशाळ
-----