आषाढी महापुजेचा योग कधी.. यावर अजितदादा म्हणाले,'जे मिळालं त्यावरच समाधान मानायचं !'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:46 PM2020-11-26T12:46:57+5:302020-11-26T12:47:24+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित झाली कार्तिकी वारीची शासकीय महापूजा
पंढरपूर : कार्तिकी वारीची महापूजा केली, आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी येणार? अर्थात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कधी बसणार असा अप्रत्यक्ष प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंढरपुरात विचारण्यात आला. त्यावर “जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं” असं म्हणत अजितदादांनी प्रश्न टोलवला. ते साकडं इथे नसतं घालायचं नसतं. विरोधात असलेल्या प्रत्येकाला सरकारमध्ये जावंसं वाटत असतं. आम्हीही विरोधात होतो, आम्हालाही वाटायचं आपण सरकारमध्ये जावं, लोकांची कामं करावी. त्यावेळी जे सरकारमध्ये होते, ते आता विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना वाटणारच हे सरकार जावं आणि आपल्याला संधी मिळावी. या राजकीय गोष्टी चालत असतात,
त्यात पांडुरंगाला ओढायचं काही कारण नाही. जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं आणि पुढे जायचं असतं, आपलं काम करायचं असतं” असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.पंढरपुरात आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना सपत्नीक मिळत असतो. आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी येणार? असा आडून प्रश्न विचारत पत्रकारांनी अजित पवारांना मुख्यमंत्रिपदावर कधी विराजमान होणार, असे अप्रत्यक्षपणे विचारले. मुख्यमंत्री निवडण्याची वेळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आलीच, तर ते कन्या सुप्रिया सुळे यांची निवड करतील, पुतणे अजित पवार यांची नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.