पूर्वी काही कारणाने काही घराण्यातील वंश खंडित झाला. घरातील मूर्तींचे पूजन करण्यात अडचणी येऊ लागल्या किंवा घरात नवीन देवदेवतांच्या मूर्ती आणल्या तर पूर्वीच्या या मूर्ती समुद्रात अथवा नदीच्या पाण्यात विसर्जित केल्या जात असत. काही लोक या मूर्तींचे विसर्जन न करता प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या मंदिरात नेऊन देत असत. पूर्वीच्या काळापासून ही प्रथा पाळली जात आली आहे.
पंढरपूर हे पूर्वीपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असल्याने ही मंडळी आपले देव विठ्ठल मंडईत आणून देत. येथे बैरागी कुटुंब गेल्या १८ पिढ्यांपासून या मूर्ती स्वीकारून त्यांचे पूजन करत होता. नामदेव महाद्वार बांधण्यापूर्वी १९९७ पर्यंत येथे ३३ कोटी देवता मंदिर महाद्वारात होत्या. बैरागी यांच्या १८ पिढ्या गेली ७०० वर्षांपासून येथे या मूर्ती घेण्याचे व त्यांचे पूजन करायचे काम करीत होती. यानंतर महाद्वाराचे बांधकाम करताना या ३३ कोटी देवता मंदिर पाडून, सर्व पुरातन मूर्ती मंदिर समितीने ताब्यात घेतल्या होत्या. याच मूर्ती मंदिरातील एका खोलीत ठेवून त्याचे पूजन होत होते.
मंदिर समिती प्रशासनाने या मूर्ती बाहेर काढून यातील अतिशय पुरातन आणि दुर्मीळ मूर्ती वेगळे करायचे काम केले आहे. काही मूर्ती एक फुटाच्या तर काही दोन फूट उंचीच्या आहेत. श्रीकृष्णाची विविध रूपे असलेल्या या कोरीव धातूंच्या मूर्ती अतिशय देखण्या व मौल्यवान आहेत. १ किलोपासून १२ किलो वजनापर्यंत या मूर्ती असून, अनेक लहान मूर्ती मात्र प्रशासनाने बाजूला ठेवून दिल्या आहेत.
आता या मूर्ती वेगळ्या केल्यावर विठ्ठल सभामंडपात या मूर्ती ठेवण्यासाठी एक दालन बनवले असून, या दालनात या पुरातन मूर्ती भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. सध्या कोरोनामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिर खुले झाल्यानंतर या देखण्या पुरातन मूर्ती पाहण्याचा आनंद भाविकांना घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
----
या देवतांच्या मूर्ती
शेकडो वर्षांपूर्वीच्या कृष्ण, महादेव, गणेश, विष्णू, बालाजी, शाळीग्राम, यांसह देवीच्या विविध रूपातील कोरीव मूर्ती बाजूला काढल्या आहेत. यात गरुडाची मूर्ती, महिषासूर वध करणारी महिषासुरमर्दिनीची मूर्ती, रिद्धी-सिद्धीला घेऊन बसलेला गणेश, पार्वती मातेसह विराजमान महादेव अशा अनेक दुर्मीळ मूर्ती आहेत. गोपाल कृष्णाच्या मूर्तीजवळ गायी उभ्या असलेली मूर्तीही आहे. यातील काही मूर्ती तर ७०० ते एक हजार वर्षांपूर्वीच्या असून, या पंचधातू, तांबे, पितळ अशा धातूंपासून बनवलेल्या भरीव मूर्ती आहेत.