सोलापूर : केंद्र सरकार हे अनुसूचित जाती/जमाती (एससी/एसटी) विरोधात मोठे षङ्यंत्र करत आहे. त्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आवाज उठवताना दिसत नाही. असे म्हणत आता कुठे गेले रक्त? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकरांना विचारला.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप हटाओ देश बचाओ या आंदोलनादरम्यान सभेला संबोधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. या निवडणुक ीत प्रकाश आंबेडकरांमुळेच शिंदे यांचा पराभव झाला असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी सोबतच एमआयएमवर टीका केली.
भारतीयांसाठी धोकादायक असणाºया एनपीआर, एनआरसी व सीएए विरोधात एमआयएमने एकतरी आंदोलन केले का? आता कुठे गेले तुमचे रक्त ? एससी, एसटी विरोधात इतके मोठे षङ्यंत्र होत असताना तुम्ही दिसतच नाही. हे सगळे भाजपचे बगलबच्चे आहेत. ‘वाह रे मोदी तेरी चाल वंचित-एमआयएम तेरे दलाल’ असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.
महिलांवर अत्याचार होत आहेत, एलपीजी गॅसच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. अनेक मुद्यांवर आपल्या सगळ्यांना माणुसकीच्या नात्याने रस्त्यावर उतरायचे आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि राहणारच, भाजपच्या विकृत मानसिकतेविरोधात आपण पेटून उठू हम सब एक है आखरी दम तक एक रहेंगे असे म्हणत आश्वस्त केले.