अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ७२ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकताच लागला. त्यामध्ये तालुका पातळीवरील काही पुढाऱ्यांना मतदारानी झटका दिला तर काहीजण गाव ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले. यामुळे जिंकलेल्या गटामध्ये उत्साह पसरला आहे, तर पराभव झालेली मंडळींच्या गटामध्ये सन्नाटा पसरला आहे. अनेकांना या निवडणुकीनं आत्मपरीक्षण करायला लावलं आहे.
विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हन्नर गाव पारंपरिक विरोधक भरमशेट्टी गटांना सोबत घेऊन कधी नव्हे यंदा काही उमेदवार बिनविरोध केले, तर तिसऱ्या गटाने काही जागेसाठी निवडणूक लावून आव्हान दिले होते. त्या सर्व जागा कल्याणशेट्टी गटाने एकतर्फी जिंकून आणल्या. माजी आमदार सिद्रमप्पा पाटील गटाने कुमठे गाव पन्नास वर्षांपासून आजही बिनविरोध करून ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या चिंचोळी (मैं.) ग्रामपंचायतमध्ये स्थानिक गटांनी बाजी मारली. चप्पळगाव जिल्हा परिषद गटाचे भाजपच्या सदस्या मंगल कल्यांणशेट्टी यांनी आपले हन्नूर गाव जिंकून निवडणुकीच्या निमित्ताने तंटामुक्त केले. नागणसूर गटाचे काँग्रेसचे सदस्य शीलवंती भासगी यांच्या नागणसूर गावी स्थानिक गटाची सत्ता आली. जेऊर गटाचे काँग्रेसचे सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांनी तिसऱ्या पिढीपासून ताब्यात राहिलेले गाव यंदाही काबीज केले.
मंगरूळ गटाचे अपक्ष सदस्य शिवानंद पाटील यांनी कुमठे गाव सदस्य बिनविरोध करून परंपरा यंदाही कायम ठेवली. चप्पळगाव गणाचे पंचायत समितीचे भाजप सदस्य के. पी. पिरजादे यांनी काँग्रेसच्या परंपरागत गटाच्या विरोधात यंदाही विरोधी गट तयार करून निवडणूक लढले. सत्ता आली नसलीतरी चुरशीची निवडणूक करून सत्ताधाऱ्यांना पाच, तर विरोधी गटाला चार जागा मिळाल्या. साफळे गटाचे भाजपचे सदस्य राजेंद्र बंदीछोडे यांच्या हातून १५ वर्षांचे सत्ता हिसकावून घेण्यात विरोधक यशस्वी ठरले. बंदिछोेडे गटाचे तीन सदस्य ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराज होऊन विरोधी गटात गेल्याने त्यांना फटका बसल्याची चर्चा आहे.
वागदरी येथील भाजपचे सदस्य गुंडप्पा पोमाजी यांच्या गटाचा पराभव करीत विरोधी गटाने बाजी मारली. सलगर गणाचे काँग्रेसचे सदस्य भौरम्मा पुजारी मिरजगी गाव पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले. मुगळी गणांचे काँग्रेसचे सदस्य आनंदराव सोनकांबळे यांना आपले भोसगे गाव ताब्यात ठेवण्यात अपयश आले. विरोधकांनी सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. तोळणूर गणाचे भाजपच्या सदस्य कविता हिरेमठ यांच्या हैद्रा गावात विरोधी गटाने बाजी मारली. नागणसूर गणांचे काँग्रेसचे सदस्य नितीन ननावरे यांच्या गौडगाव बु. मूळगावी यंदाही विरोधी गटाने मैदान जिंकले. सुलेरजवळगे गणांचे अपक्ष सदस्य सुरेखा गंगदे यांच्या मुंढेवाडी गावात काठावर सत्ता आली. जेऊर गणाचे काँग्रेसचे सदस्य माजी सभापती सुरेखा काटगाव यांनी आपले हंद्राळ गाव बिनविरोध करून आपल्या गटाचे संख्याबळ अधिक ठेवण्यात बाजी मारली. दहिटणे गणांचे काँग्रेसचे सदस्य विलास गव्हाणे यांचे दोड्याळ गाव अनेक वर्षांपासून ताब्यात ठेवले. यंदा नऊ पैकी सात जागा बिनविरोध होऊन केवळ दोन जागेसाठी निवडणूक झाली. तेही बिनविरोध समितीचे निवडून आले. बोरोटी या गावी भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड गटाने मागील पंचवीस वर्षांपासून आजही सत्ता अबाधित ठेवली आहे.