करमाळा (सोलापूर) : मनोहरमामा भोसले याच्याकडे जमा झालेल्या ४४ लाख रुपयांचे अकाऊंट सील केले आहे. ही रक्कम कुठून व कशी आणली, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी भोसले यास मंगळवारी न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांच्यासमोर हजर करून त्यास सात दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने मनोहरमामाला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनोहरमामा भोसले याला पोलिसांनी २० सप्टेंबरला करमाळा न्यायालयात हजर केले असता, त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. दरम्यान, चारच दिवसात भोसले आजारी पडल्याने त्याला सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी भोसले याची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर भोसले याला न्यायालयात हजर केले.
कोठडीसाठी १४ कारणेफिर्यादीला जी चिठ्ठी दिली होती, त्यातील हस्ताक्षर व भोसले याचे हस्ताक्षर याचा तपास करायचा आहे. तसेच कपड्यांचीही तपासणी करायची असून, इतर आरोपींनाही अटक करायची आहे. अशाप्रकारे १४ कारणे सांगून पोलीस कोठडीची मागणी केली. यास आरोपीचे वकील ॲड. गायकवाड यांनी हरकत घेतली तर सरकारी वकील ॲड. सचिन लुणावत यांनीही पोलिसांची मागणी योग्य असल्याचे म्हणाले.