सोलापूर : शिवसेनेच्या उमेदवारीवरून सोलापूर शहर मध्य आणि करमाळा मतदारसंघातील तिढा अखेर बुधवारी दुपारी सुटला. करमाळ्यातून रश्मी बागल तर शहर मध्य मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी मिळाली. विशेष म्हणजे बागल आणि माने हे दोघेही बुधवारी पुण्यात होते. दोघांसाठी ‘मातोश्री’वरून दोघांनाही ए व बी फॉर्म पाठवून देण्यात आले. आमदार नारायण पाटील आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे बुधवारी रात्री उशिरापर्यंत ‘मातोश्री’वर ताटकळत होते.
युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला सहा तर भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेला दोन जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने सांगोला, बार्शी, मोहोळ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. माढ्यात उमेदवार निश्चित झालेला नव्हता. शहर मध्य मतदारसंघातून जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यात तर करमाळ्यासाठी आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल यांच्यात रस्सीखेच सुरू होती. रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीतून तर दिलीप माने यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. बागल आणि माने यांच्या उमेदवारीसाठी जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत हे बागल आग्रही होते. कोठे आणि आमदार पाटील यांच्यासाठी सोलापूरचे माजी संपर्कप्रमुख तथा खासदार राहुल शेवाळे यांनी ऐनवेळी उडी घेतली. मातोश्रीवर गेले तीन दिवस यावर खलबते झाली.
सावंत म्हणतील तीच पूर्व दिशा - उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत तानाजी सावंत म्हणतील तीच पूर्व दिशा असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. लोकसभा निवडणुकीत सावंत यांनी विद्यमान खासदार रवी गायकवाड यांचे तिकीट कापून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली. निंबाळकर निवडूनही आले. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला सहा जागा आहेत. सहापैकी पाच जागांवर तानाजी सावंत यांनी निश्चित केलेल्या उमेदवारांना सेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. माढ्याच्या उमेदवारीचा निर्णय सावंत यांनी शिंदे विरोधकांवर सोपविला आहे.
समर्थकांचे दावे-प्रतिदावे - कोठे गटातील नगरसेवकांच्या मते, महेश कोठे यांना सोमवारी दुपारीच अनिल देसाई यांनी ए व बी फॉर्म दिला होता. यादरम्यान जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. तानाजी सावंत ‘मातोश्री’वर पोहोचले. त्यांनी कोठे यांच्या हातून फॉर्म काढून घेतला. कोठे तातडीने बाहेर पडले असते तर पक्षातील नेत्यांना उमेदवारी मागे घेता आली नसती. माने समर्थकांच्या मते दोन दिवसांपूर्वी माने आणि बागल यांना पक्षाकडून ए व बी फॉर्म देण्यात आले होते. पक्षात गोंधळ नको म्हणून याबद्दल खुलासा करण्यात आला नव्हता.
सोशल मीडियावर ए व बी फॉर्म व्हायरल - करमाळा व शहर मध्यच्या जागेवर बुधवारी ‘मातोश्री’वर निर्णय होईल, असा निरोप दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना देण्यात आला होता. करमाळ्याच्या जागेसाठी राहुल शेवाळे, आमदार नारायण पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राहुल शेवाळे यांनी चर्चा करून बुधवारी निर्णय द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते. परंतु, बुधवारी १२ वाजता रश्मी बागल यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ए व बी फॉर्म व्हायरल केले. त्यानंतर तत्काळ दिलीप माने यांनीही सोशल मीडियावरून उमेदवारी जाहीर झाल्याचे संकेत दिले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. माने यांच्या ए व बी फॉर्मची प्रत सोशल मीडियावर आली नव्हती. त्यामुळे खरंच माने यांना उमेदवारी मिळाली का? याबद्दल कोठे समर्थकांनी प्रश्न उपस्थित केला. परंतु, त्याचाही उलगडा झाला.
बबनदादांचा पत्ता कापला, आता विरोधकांचा मेळ घालणार- राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्याची तयारी जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी सोमवारी दाखविली होती. परंतु, मोहिते-पाटलांसह माढ्यातील शिंदे विरोधकांनी मंगळवारी तानाजी सावंत यांचे घर गाठले. बबनदादांच्या उमेदवारीला विरोध केला. विरोधकांनी एक उमेदवार निश्चित करावा. त्याचे नाव मला सांगावे, असे सावंत म्हणाले. या बैठकीनंतर सावंत यांनी शिंदे बंधूंना प्रतीक्षेत ठेवले. यामुळे बबनराव शिंदे राष्टÑवादीच्या संपर्कात आले. इकडे विरोधकांमधून एक उमेदवार देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होती. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप नेते कल्याणराव काळे यांचे नाव पुढे केले. काळे यांच्यासोबत माढ्यातून संजय कोकाटे आणि शिवाजी कांबळे असे पर्याय आहेत. आमच्यातून एक उमेदवार निश्चित होईल, पण उमेदवारी मिळाली नाही म्हणून आमच्यातील कोणी बंडखोरी करणार नाही, असे संजय कोकाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, सेनेकडून कल्याणराव काळे यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे.