सोलापूर : मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढली असून,उत्तर सोलापूरचे ग्रामस्थ या संकटाकडे संधी म्हणून पाहू लागले आहेत. त्यातच पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने प्रशिक्षणात मिळालेली ऊर्जा गावांच्या कामाला आली आहे. सोमवारी २३ गावांतील ९ हजार ५६० महिला-पुरुष व तरुणांनी श्रमदानात भाग घेतला असून, हे श्रमदान कुठे रात्री बारा वाजल्यापासून तर कुठे पहाटेपासून सुरू आहे.
काही ठिकाणी रविवारी रात्री १२ वाजता तर कोणत्या गावी भल्या पहाटेपासून नागरिकांनी श्रमदानाला सुरूवात केली. काही गावांत रात्री भजन, दिंडी काढण्यात आली. रानमसलेकर नागरिक गावातून दिंडी काढून श्रमदानाच्या ठिकाणी गेले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ ची सुरुवात शोषखड्ड्यापासून करण्यात आली. वॉटर कप स्पर्धेसाठीचे प्रशिक्षण घेऊन परतलेल्यांनी पाणी चळवळ रुजविण्यासाठी घेतलेल्या बैठकांचा परिणाम रविवारी रात्री दिसून आला. महिला-पुरुषांसह तरुणांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानात सहभाग नोंदविला.
पहिल्या दिवशी तालुक्यातील २३ गावांत ९ हजार ५६० नागरिक श्रमदानात सहभागी झाले होते, असे तालुका समन्वयक अतिश शिरगिरे यांनी सांगितले. याशिवाय अन्य गावांतही श्रमदानाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
साखरेवाडी, कळमण, गावडीदारफळ, वांगी, पडसाळी, वडाळा, रानमसले,नान्नज, नरोटेवाडी, होनसळ, तरटगाव, अकोलेकाटी, कारंबा, गुळवंची, भोगाव,बाणेगाव, कोंडी, हिरज, तिºहे, कवठे, डोणगाव, नंदूर, भागाईवाडी आदी गावे वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत़वांगीत रात्री हातात टाळ-मृदंगावर ताल धरत पाणी फाउंडेशनच्या कामाला सुरुवात केली. रानमसले, कोंडीत मोठ्या जिद्दीने कामाला सुरुवात झाली. भागाईवाडीत यावर्षी एक हजार रोपांची लागवड करुन संवर्धन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
- २०१७ मध्ये बेलाटी, हिरज, भागाईवाडी तर २०१८ मध्ये वडाळा, हिरज, गावडीदारफळ ही गावे तालुक्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आली होती.
वडाळ्याची यंदाही दमदार सुरुवात- मागील वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळालेल्या वडाळा गावाने याही वर्षी श्रमदानाला दमदार सुरुवात केली. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्या मागील वर्षीपेक्षाही यावर्षी अधिक काम करणार असल्याचे सांगितले.