सोलापूर : ‘पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे घराणे लवकरच भाजपात येणार; अशी घोषणा करणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शब्द सोमवारी खरा ठरणार, की ‘दोन दिवस थांबा, सारे चित्र स्पष्ट होईल,’ अशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत आशा व्यक्त करणारे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांची इच्छा पूर्ण होणार, याकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत अद्यापही निश्चिती न झाल्याने उमेदवारीचा प्रश्न कायम आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत पक्षात अद्यापही निर्णय होऊ शकला नाही. शरद पवार यांना विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी द्यायची असली तरी विजयदादांचा आपले पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह आहे; मात्र अनेक स्थानिक नेत्यांनी रणजितसिंह यांच्या नावाला विरोध केला आहे.
‘अशात माढ्यात सर्वसमावेशक उमेदवार देऊ,’ असे सूचक वक्तव्य आ. अजित पवार यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे आता हा सर्वसमावेशक असणारा उमेदवार कोण? याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यास इतर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवावी, अशी भूमिका मोहिते-पाटील समर्थकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विजयदादा उद्या काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन दिवसांपूर्वी डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी पवार यांनी मोहिते-पाटील यांचे काम करा, असे सांगितले होते, त्यावर आपण तुमच्या नेतृत्वाखाली काम करू, इतरांच्या नव्हे, अशी धवलसिंह यांनी भूमिका व्यक्त केली होती. आपण लवकर भाजपामध्ये जाणार आहे, असे मोहिते-पाटील यांनी सांगितले होते; मात्र ज्यावेळी जायचे त्यावेळेस जा, आता आमच्यासोबत काम करा, असे पवार त्यांना म्हणाले होते. मात्र, विजयदादांसोबत काम करावे लागेल, अशी सूचना करणाºया शरद पवारांच्या मनात मोहिते-पाटलांचीच उमेदवारी पक्की असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी न दिल्यास किंवा इतरांना दिल्यास मोहिते-पाटील भाजपामध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर रणजितदादा भाजप मंत्र्याच्या भेटीला अन् दादा शरद पवारांच्या भेटीला गेल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागली आहे.
भाजपाकडून उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने सहकार मंत्री सुभाष देशमुख कामाला लागले होते; मात्र त्यांचेही तळ्यात-मळ्यात आहे, असे दिसू लागले आहे. त्यांच्या घरासमोर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, या मागणीसाठी कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे देशमुख यांची भूमिका काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
तर मोहिते-पाटलांना राष्ट्रवादीची उमेदवारीच्काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील दोन मोठी घराणी भाजपामध्ये प्रवेश करणार, असे सांगितले होते. अहमदनगरमध्ये सुजय विखे-पाटील यांनी भाजपामध्ये जात मोठा धक्का दिला होता. त्यानंतर मोहिते-पाटीलदेखील भाजपामध्ये गेल्यास राष्ट्रवादीची निवडणुकीच्या तोंडावर गोची होऊ शकते. त्यामुळे मोहिते- पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिली जाऊ शकते.