सोलापूर : सरकारी कर्मचारी असल्याचे भासवत जमिनीची मोजणी करून नकाशा मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसम बाळासाहेब एकनाथ केदार (रा. वासुद, सांगोला) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांची मौजे गायगव्हाण येथे जमीन असून या जमिनीची मोजणी होऊन नकाशा मिळवून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय सांगोला येथे कार्यालयात काम करणारा खासगी इसम बाळासाहेब केदार याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेखमधील, मॅडम हे आपल्या चांगल्या परिचयाचे असून मोजणी करून देण्याचे काम करून देऊ, असे सांगत दहा हजार लाचेची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना केदार याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या घटनेची पडताळणी सोमवारी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून त्याला पकडण्यात आले. याबाबत बाळासाहेब केदार याच्यावर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, प्रमोद पकाले, गजानन किणगी यांनी केली.