सोलापूर : जुळे सोलापूर ते होटगी रोड रस्त्याला जोडणाऱ्या आसरा पुलावर वाहतुकीची वर्दळ वाढल्याने बाजूने नवा पूल बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जागेचे मंगळवारी दुपारी मोजमाप घेतले. पुलाच्या बाजूच्या घरापर्यंत मीटर टेपची पट्टी गेल्यावर काठी टेकत आलेल्या आजोबांनी माझं घर जाईल का हो? असा सवाल केल्यावर अधिकारी आचंबित झाले.
नगर रचनाचे सहायक संचालक केशव जोशी, नगर रचना विभागाचे उपअभियंता लक्ष्मण चलवादी, नगर अभियंता संदीप कारंजे, उपअभियंता झेड. ए. नाईकवाडी, रस्ते विभागाचे सहायक अभियंता शांताराम अवताडे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चौबे, अवेक्षक नागनाथ बाबर, गणेश काकडे, भूमी मालमत्ता विभागाचे तांत्रिक सेवक सिद्राम तुपदोळकर, रस्ते विभागाचे अवेक्षक विष्णू कांबळे यांच्या पथकाने आसरा चौकाजवळ रेल्वे ब्रीजशेजारी नव्याने पूल कोणत्या बाजूने बांधण्यास रस्त्याची रुंदी मिळेल, त्या अनुषंगाने पाहणी केली.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी डीपी प्लॅनमध्ये २४.३८ मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी कोणत्या बाजूला जागा उपलब्ध होईल, या दृष्टीने दोन्ही बाजूला मोजमाप घेऊन बाजूच्या इमारतीवर खुणा करण्यात आल्या. या अंतरात पुलाच्या बाजूला असणाऱ्या झोपड्या व घरे बाधित होतील असे दिसून आले. त्यामुळे या अंतरात खुणा केलेल्या अतिक्रमित बांधकामे काढावी लागतील, अशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मोजमाप घेताना ही चर्चा बाजूच्या झोपडपट्टीतील लोकांपर्यंत गेली. त्यामुळे महिला व इतर लोक गोळा झाले. झोपडपट्टीच्या पत्र्यापासून मोजमाप करताना संबंधित झोपडपट्टीधारकांनी उत्सुकता व भीतीने आमची झोपडी रस्त्यात जाईल का? अशी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी हसून उत्तर दिले, अजून मोजणी सुरू आहे.
समांतर पूल बांधणार
सध्या अस्तित्वात असलेला आसरा उड्डाणपूल पूर्ण पाडून नव्याने दुहेरी पूल बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाने दिला होता; पण महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी हा पूल तसाच ठेवून समांतर नवा पूल बांधण्याची सूचना केली आहे. त्यानुसार नगररचना कार्यालयाने आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने मोजमाप घेतल्याचे सहायक अभियंता आवताडे यांनी सांगितले.
अतिक्रमण हटविण्यासाठी नाेटीस
नवीन समांतर पुलाचा आराखडा तयार झाल्यानंतर बाधित होणाऱ्या अतिक्रमित बांधकामांना पाडकामाची नोटीस दिली जाणार आहे. नगर अभियंता कार्यालयाने रस्त्याला डीपी प्लॅनप्रमाणे रुंदी मिळेल का? याची खातरजमा केली. नगररचना कार्यालयाने केलेल्या मोजणीवरून नवीन पूल कोणत्या दिशेने बांधता येईल, यावर आराखडा तयार केला जाईल. पूल उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्याबद्दल जुळे सोलापूरवासीयांमध्ये आनंद व्यक्त हाेत आहे.
आसरा रेल्वे पुलाशेजारीच नवीन समांतर पूल उभारण्यासाठी नगररचना कार्यालयाने मोजमाप घेतले. डीपी प्लॅनमध्ये या ठिकाणी २४.३८ मीटर रस्ता आहे. त्या अनुषंगाने मोजमाप घेतले. कोणत्या बाजूने पूल बांधणे सोयीस्कर होईल, हे उपलब्ध जागेवरून ठरविले जाणार आहे.
संदीप कारंजे, नगर अभियंता