राजकुमार सारोळे।
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौºयात पालकमंत्री व सहकारमंत्री गटातील गटबाजीचे दर्शन पुन्हा सर्वांना पाहावयास मिळाले. मुख्यमंत्र्यांसमवेत हेलिकॉप्टर व गाडीत एकत्र बसलेले दोन्ही देशमुख जमिनीवर मात्र एकमेकांना हातभर दूर ठेवताना दिसून आले.
पंढरपुरातील भक्तनिवास व सोलापुरातील वडार समाजाच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी सोलापूर दौºयावर आले होते. नागपूरने विमानाने त्यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित होते. विमानातून उतरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन्ही मंत्र्यांनी स्वागत केले. त्यानंतर पंढरपूरला जाण्यासाठी दोन्ही देशमुख मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरने रवाना झाले. पंढरपूरला जाण्या-येण्यासाठी दोन्ही मंत्र्यांचा हवाई दौरा झाला. या दौºयादरम्यान दोघे एकत्र होते.
हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर दोघेही अंतर ठेवूनच बाहेर आले. त्यानंतर मात्र ताफ्यातील सफारी गाडीत मुख्यमंत्री फडणवीस पुढच्या सीटवर बसले व मागील सीटवर दोघांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बसले. पार्क स्टेडियममधील कार्यक्रमस्थळावर आल्यावर पुन्हा दोघांनी एकमेकांपासून दूर राहणे पसंत केले. सहकारमंत्री देशमुख हे मुख्यमंत्र्यांजवळ होते तर पालकमंत्री देशमुख एकदम पाठीमागे थांबले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करतानाही हीच स्थिती होती. दीप प्रज्वलन झाल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बोलत पुढे निघाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दोघांना माघारी बोलावले व एकत्रित फोटोसाठी हात उंचावून पोझ दिली. कार्यक्रम सुरू झाल्यावरही दोन्ही देशमुख मुख्यमंत्र्यांपासून दूर बसले.
विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आल्यावरही दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने थांबले होते. विमानतळाच्या प्रवेश कक्षाच्या डाव्या बाजूला पालकमंत्री देशमुख, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याबरोबर बोलत थांबले होते तर त्यांच्या बाजूला सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक शिवानंद पाटील, वैभव हत्तुरे, अमर पुदाले थांबले होते. उजव्या बाजूला सहकारमंत्री देशमुख यांच्यासमवेत महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, रामचंद्र जन्नू, वीरभद्रेश बसवंती बोलत थांबले होते.
बापूंचा तिरपा कटाक्ष- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी दोन्ही मंत्री विमानतळावर प्रतीक्षेत होते. सहकारमंत्री सुभाषबापू यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर महापौर बनशेट्टी व इतरांबरोबर बोलत ते बाहेर थांबले. इतक्यात आतून पालकमंत्री विजयकुमार देशमुख बाहेर आले. पाठोपाठ त्यांचे कार्यकर्ते होते. मालक आपल्या आधीच विमानतळावर पाहून बापू यांनी त्यांच्याकडे तिरपा कटाक्ष टाकला. ही बाब अमर पुदाले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्मितहास्य करून प्रतिसाद दिला.