: पणजोबाच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला पुण्याहून पानगाव (ता. बार्शी) या मूळगावी मित्राला सोबत घेऊन दुचाकीवरून निघालेला पणतू आणि त्याचा मित्र कडबा भरून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून जागीच ठार झाले. टेंभुर्णी - कुर्डूवाडी रस्त्यावरील अंबाड गावच्या हद्दीत गाडेवस्तीनजीक गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
अजित पोपट सावंत (वय २०,रा. वाघोली, पुणे) व मित्र अक्षय विनोद गोरखे (वय २४, रा. वाघोली,पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. समोर चाललेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविले नसल्याने त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोघा जखमींना तातडीने कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्या दोघांच्या डोक्याला, छातीला व हातापायाला खूप मार लागल्याने ते जागीच मृत्यू पावले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत पोपट भास्कर सावंत ( रा. बोरिवली, मुंबई, मूळगाव पानगाव) यांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी पोपट सावंत यांचे मूळगाव पानगाव (ता.बार्शी) आहे. सध्या त्यांचे कुटुंब पुणे व मुंबईत स्थायिक झाले आहे. फिर्यादीचे आजोबा मारुती जाधव (आईचे वडील) यांचे शुक्रवारी वर्षश्राद्ध होते. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य गावाकडे निघालेले होते. त्यात अजित सावंत हा रेल्वेने व बसने न निघता त्याचा मित्र अक्षय गोरखे याच्या सोबत (एम.एच- १२,आर.बी.- २५२०) गुरुवारी दुपारी ३ वाजता दुचाकीवरून निघाले होते. ते टेंभुर्णी - कुर्डूवाडी रस्त्यावरील अंबाड गावच्या हद्दीत गाडे वस्तीनजीक रात्री १०:३० च्या सुमारास आले असता समोर कुर्डूवाडीकडेच चाललेला ट्रॅक्टर (एम.एच-४५,ए.एल-३९०६) बिगर नंबरच्या ट्रॉलीत कडबा घेऊन जात होता. दुचाकीस्वारांना समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीच्या लाईटमुळे दिसला नाही. त्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर व दिशादर्शक काहीही बसविले नसल्याने त्यांना त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाठीमागून ते सरळ येऊन त्या ट्रॉलीला धडकले. त्यात वेगात असणाऱ्या दुचाकीला ट्रॉलीची जोराची धडक झाल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले व जागीच मृत्यू पावले.
त्यामुळे ट्रॅक्टर चालक सूर्यकांत नामदेव कुटे (रा. टेंभुर्णी, ता.माढा) याच्याविरुद्ध पोपट सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार माळी करीत आहेत.
------
वर्षश्राद्धाऐवजी अंत्यसंस्काराची वेळ
- वर्षश्राद्धासाठी आलेल्या सावंत कुटुंबीयांवर घरातील कर्त्या अजित सावंत याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. अजितसोबत आलेला आणि याच अपघातात मृत्यू पावलेला अक्षय गोरखे याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी शुक्रवारी पुण्याकडे पाठवण्यात आला.
----
नातलग अन् पोलिसांचे डोळे पाणावले
- अपघात झाल्याचे वृत्त समजताच अक्षयचे नातलग सागर सुरवसे हे कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेला कार्यरत आहेत. ते ड्यूटीचा भाग म्हणून घटनास्थळी पोहोचले. परंतु मुलाचा चेहरा पाहून तो नातलग असल्याचे त्यांनी ओळखले. त्यांचेही डोळे पाणावले. त्यांनी सावरुन नातलगांना पानगाव येथे फोन केला. सावंत परिवारावर शोककळा पसरली. सर्वांनी एकच हंबरडा फोडला.
----१२अजित सावंत-ॲक्सिडेंट/ १२अक्षय गोरखे-ॲक्सिडेंट--