सोलापूर: पेट्रोलिंग करीत असताना, रस्त्यावरून जाणाऱ्या कारला पोलिसांनी कारला थांबवून हटकले. संशय आल्याने आतील दोघांकडे चौकशी केली, तेव्हां पाठीमागिल बाजूस गुटख्याचे ७५० पाकिटे मिळून आले. कारमधील दोघांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने फिर्याद दिली आहे.
अजय विलास लोंढे (वय २९ रा. लक्ष्मी नगर बाळे), अमर संगप्पा दासरी (वय ३५ रा. माधव नगर एमआयडीसी रोड सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे २५ मार्च रोजी सकाळी पेट्रोलिंग करीत होते. ते कर्णिक नगर येथील रिक्षा स्टॉप जवळ आले, तेव्हां त्यांना एक पांढऱ्या रंगाची कार येताना दिसली. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना कारचा संशय आला, त्यांनी चालकाला थांबलण्याचा इशारा केला. कार चालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, पोलिसांनी आडवे जाऊन थांबवले.
संशय आल्याने त्यांनी कार मधील दोघांना बाहेर येण्यास सांगितले. चौकशी करत असताना, त्यांना संशय आला. कारमध्ये पाहिले असता, आतमध्ये पाठीमागच्या सिटवर व डिक्कीमध्ये पाकिटे आढळून आले. उघडून पाहिले असता त्यात सुगंधी गुटखा आढळून आला. पोलिसांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी रेणूका पाटील या पोलिस ठाण्यात गेल्या, त्यांनी गुटख्याची पहाणी करून फिर्याद दिली. पोलिसांनी ९० हजाराचा गुटखा व कार जप्त करून, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.