सोलापूर/सांगोला - भरधाव दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत सासरवाडीला गेलेल्या जावई पोलीस वाहतूक कर्मचाऱ्याचा डोक्याला मार लागून उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर, दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याच्या पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास गौडवाडी येथील मुलांकी वस्तीजवळ हा अपघात झाला आहे.
मेजर नानासाहेब पांडुरंग नकाते (वय ५२, रा. अकोला-नकातेवाडी, ता. सांगोला) असे मृत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर नकातेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सांगोला व पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते. बांधकाम विभाग सांगोला शाखा अभियंता बाळासाहेब नकाते यांचे ते भाऊ होत.
मूळचे अकोला-नकातेवाडी (ता. सांगोला) येथील मेजर नानासाहेब पांडुरंग नकाते यांनी भारतीय सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस खात्यात ते रुजू झाले होते. पोलीस काॅन्स्टेबल नानासाहेब नकाते हे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेकडे कर्तव्य बजावत होते. त्यांना मंगळवारी साप्ताहिक सुटी असल्याने ते पंढरपूर येथून सकाळी दुचाकीवरून पाचेगाव (ता. सांगोला) येथे सासरवाडीला गेले होते.
दिवसभर सासरवाडीचा पाहुणचार घेऊन सायंकाळी ७.३० च्या सुमारास परत पंढरपूरकडे येत असताना त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीशी जोराची धडक होऊन अपघात झाला. यात नानासाहेब नकाते यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर वजीर तांबोळी (रा. कोळे, ता. सांगोला) हेही अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांनाही पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शंभूराजे साळुंखे यांनी पोलिसात खबर दिली आहे.