सोलापूर : कर्नाटकातून शहापूरहून मुंबईकडे सुसाट निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात डिव्हायडर तोडून सुसाट सुटली अन् सर्व्हिस रोडवर थांबली. एका क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला. शेळगी परिसरातील धोत्रीकर वस्तीजवळ हा विचित्र अपघात झाला. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, वारंवार येथे अपघात होत असल्याने या मार्गावर ब्रीज व्हावा म्हणून नागरिकांनी ठिय्या मांडल्याने हायवेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.
कर्नाटकातून शहापूरमार्गे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशाने निघाली होती. सोमवारी रात्री १०:१५च्या सुमारास बसने मार्केट यार्ड पार केले. धोत्रीकर वस्तीजवळील रोड पार करीत असताना समोरून एक पादचारी रस्ता पार करीत होता. त्याच्या वाचवण्यासाठी चालकाने बस सर्व्हिस रोडच्या दिशेनं वळवली. डिव्हायडर तोडून सर्व्हिस रोडकडे गेली. बसमधील प्रवाशांना काय होतेय काही कळेना. चालकाने प्रसंगावधान राखून वेगावर नियंत्रण ठेवले अन्यथा ही बस थेट धोत्रीकर वस्तीमध्ये घुसून मोठा अनर्थ घडला असता, असे उपस्थित रहिवाशांकडून सांगण्यात आले.ब्रीजच्या मागणीसाठी वाहतूक ठप्पया रोडवर सातत्याने अपघात होत असताना प्रशासन आणि नॅशनल हायवे विभाग गांभीर्याने पहायला तयार नाही. या मार्गावर ब्रीज व्हावा यासाठी नगरसेवक सुरेश पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी रोडवर परिसरातील नागरिकांसह ठिय्या मांडल्याने हैदराबादहून मुंबई आणि मुंबईहून हैदराबादकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाकडून ठोस कारवाई व्हावी म्हणून नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.पोलिसांच्या पवित्र्याने नागरिक संतापलेअपघाताची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी धावले. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे परिसरातील नागरिक संतापल्याची भावना उपस्थितांमध्ये सुरू होती.