सोलापूर : बेकायदेशीररित्या माती वाहतूक करणाऱ्या टिपरवर कारवाईसाठी ते वाहन पोलीस ठाण्याकडे नेताना मंडल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करुन टिपरसह चालक पसार झाला. जुळे सोलापुरातील डीमार्ट कॉर्नरवर दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मंडल अधिकारी रत्नाकर अर्जुन कांबळे (वय- ३८, रा. बी. ५०, जुळे सोलापूर) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे महसूल विभागात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दुपारी १:१५ च्या सुमारास ते दैनंदिन कामकाजात असताना डी मार्ट कॉर्नर, जुळे सोलापूर परिसरात एक मातीनं भरलेला टिपर (एम. एच. १३ एक्स ९४७७) बेकायदेशीर वाहतूक करीत असताना दिसून आला. फिर्यादीने त्याला अडवून पोलीस ठाण्याकडे कारवाईसाठी घेऊन जात असताना गाडीचे मालक दत्तात्रय भरले यांनी विरोध करुन फिर्यादीला धक्काबुक्की केली. तोपर्यंत चालकाने टिपरसह गुंगारा दिला.
या प्रकरणी शासनास मिळणारा महसूल बुडवण्यासाठी हे कृत्य केल्याबद्दल टिपर मालक, चालक व अन्य एक अशा तिघांविरुद्ध अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंध अन्वये सरकारी कामकाजात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार गायकवाड करीत आहेत.