सोलापूर : उजनी धरण १०० टक्के भरले आणि कालव्यांना पाणी सोडले, औज बंधाराही काठोकाठ भरला, हिप्परगा तलावातही पाणी येण्यास सुरुवात झाली तरी शहरात पाण्याची बोंब कायम आहे. काही भागात आजही तीन दिवसाआड तर हद्दवाढ भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मनपाची पाणीपुरवठा यंत्रणा कालबाह्य झाल्यामुळेच हे भोग नशिबी आल्याचे अधिकारी सांगत आहेत.
जलसिंचनासोबत सोलापूर शहर आणि इतर नगरपालिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणाची निर्मिती झाली आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक सांगत आले. त्यांनाही यात यश आले नाही म्हणून शहरवासीयांनी महापालिकेत सत्तांतर घडवले. भाजपनेही एक दिवसाआड पाण्याचा शब्द दिला होता. स्मार्ट सिटी योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागात दररोज पाणीपुरवठ्याचा शब्द देण्यात आला.
सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. उजनी पंपगृह, पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा विस्कळीत झाल्यास या भागातही चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवरुन पूर्व भाग, विजापूर रोड, होटगी रोड या भागातही पाणीपुरवठा होतो. सध्या या टाकीवरुन विविध भागात चार ते पाच दिवसाआड पाणी दिले जात आहे. होटगी रोडवरील शंकर नगर, रेवणसिद्धेश्वर नगर, हत्तुरे वस्ती या भागात रात्री-अपरात्री पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी शनिवारी नागरिकांनी केल्या होत्या.
कोरोनामुळे पाणीपुरवठ्यासह इतर अनेक विषयांकडे लक्ष देता आले नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांना एक अहवाल तयार करायला सांगितला होता. हा अहवाल मंगळवारी माझ्याकडे येईल. अधिकाºयांकडून मी सर्व गोष्टी जाणून घेणार आहेत. या अहवालानंतर मात्र मी पाणीपुरवठ्याच्या विषयावर काम सुरू करणार आहे.- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.
पुरवठ्याचा ताळमेळ
- १५५ ते १६० एमएलडी शहराला दररोज पाण्याची आवश्यकता
- ७० एमएलडी उजनी-सोलापूर जलवाहिनीतून दररोज मिळते
- ०५ एमएलडी हिप्परगा तलावातून मिळते (उपलब्ध असेल तर)
- ८० एमएलडी औज बंधाºयातून दररोज मिळते
- ४५ एमएलडी पाणी गळतीमध्ये जाते
- १०५ एमएलडी पाणी प्रत्यक्षात उपलब्ध होते
पाणी विस्कळीत होण्याची ही आहेत कारणे
- - उजनी ते सोलापूर जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती, पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत.
- - टाकळी ते जुळे सोलापूर पाणीपुरवठा लाईन कालबाह्य झाली. कायम गळती. पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्यास हद्दवाढ भागाच्या पुरवठ्यावर परिणाम
- - शहरात नळ पुरवठ्यासाठी १२०० किमी लाईन आहे. यातील काही लाईन बंद असूनही त्यात पाणी मुरते. काही लाईनला गळती लागते. हद्दवाढ भागात आमदार आणि नगरसेवकांच्या सल्ल्यानुसार अधिकाºयांनी चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकल्या आहेत. त्याचा फटकाही अनेकांना बसतोय.
- - चावीवाल्यांच्या कामावर अनेकदा नियंत्रण राहत नाही. चावीवाले मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या तक्रारी नगरसेवक करतात.