सोलापूर : उन्हाळ्यात भक्तांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या मंदिर आवारात फरशांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून थंडावा दिला जातो. मात्र पावसाळ्यात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिराचे छतच वॉटरप्रूफ केले जात आहे. यासाठी २०० लिटर वॉटरप्रूफ पेंट वापरले गेले आहे.
दर जानेवारी महिन्यात ग्रामदैवताची यात्रा भरत असून या यात्रेत येणाऱ्या भाविकांना सर्वाधिक सेवा देण्यावर मंदिर समितीच्या वतीने प्रयत्न असतो. उन्हाळ्यात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत पांढऱ्या रंगाचे ऑईल पेंट मारून दरवर्षी थंडावा दिला जातोय. याबरोबरच जुने रेवणसिद्धेश्वर आणि मल्लिकार्जून मंदिरातही उन्हाळ्यात हा प्रयोग केला जात असतो. तसेच उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून डोक्यावर हिरवी जाळी प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत बांधली जाते. यंदा प्रथमच मंदिराचं छत वॉटरप्रूफ केले जात आहे.इतर दोन मंदिरंही वॉटरप्रूफ..केवळ सिद्धेश्वरांचे मंदिर वॉटर प्रूफ केले जात नाही तर आवारात अन्नछत्र मंडळासमोरील मंदिर आणि साहित्य भांडार बाजूच्या मंदिराचे छत वॉटरप्रूफ केले जात आहे. मागील आठ दिवसांपासून मनोज कडले आणि त्यांचे चार रंगारी कारागीर हे काम करीत आहेत.