सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीसाठी असलेले सहा आयुर्वेदिक दवाखाने कोणाचे आहेत असा सवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी फार्मसिस्ट प्रवीण सोळंकी यांना करताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
जिल्हा परिषदेतर्फे सोलापूर जिल्ह्यात सहा आयुर्वेदिक दवाखाने चालवले जातात. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी, गाडेगाव, पंढरपूर तालुक्यातील शेळवे, करमाळा तालुक्यातील जिंती, माढा तालुक्यातील अरण येथे हे आयुर्वेदिक दवाखाने आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन फंडातून आरोग्य विभागासाठी निधी देण्यात आला आहे़ या निधीतून मोठ्या प्रमाणावर औषधे संरक्षण साहित्य व उपकरणांची खरेदी झाली आहे़ आरोग्य विभागाने हे साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना पुरवले आहे, पण आयुर्वेदिक दवाखान्याकडे दुर्लक्ष केले ही बाब निदर्शनास आल्यावर जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ. विकास सरवदे यांनी शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांची भेट घेतली व साहित्य देण्याची विनंती केली.
दरम्यान, यावर मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी आरोग्य विभागाचे फार्मसिस्ट सोळंकी यांना संपर्क साधून आयुर्वेदिक दवाखाने कोणाचे आहेत असा सवाल केला व तातडीने या दवाखान्यांना ही उपकरणे द्यावीत असे आदेश दिले. आरोग्य साहित्य मागणीबाबत जिल्हा आयुष अधिकाºयावर ही वेळ यावी याबाबत जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय झाला आहे. आयुर्वेदिक दवाखान्यासाठी शासनाकडून आलेला दहा लाखाचा निधी शिल्लक असूनही पुरेशी औषधे व उपकरणे पुरवली गेली नसल्याचे कैफियत डॉक्टर सरवदे यांनी यावेळी मांडली.