नासीर कबीर
करमाळा : करमाळाविधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या रश्मी बागल, अपक्ष नारायण पाटील व संजयमामा शिंदे यांच्यातच अटीतटीचा व चुरशीचा सामना झाला. मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांतून कमी मतदान झाल्याने कोणाला किती मताधिक्य मिळणार यातच विजयाचे गणित दडलेलं आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील ११८ गावे व माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांचा समावेश आहे. ३ लाख २ हजार ३३९ एकूण मतदारांपैकी प्रत्यक्षात २ लाख १३ हजार २५६ मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ७०.५४ टक्के आहे. त्यामध्ये पुरुष मतदान १ लाख १६ हजार २९८ तर महिला मतदान ९६ हजार ९५८ इतके आहे.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहता ६५ हजार ते ७० हजार मते प्रमुख उमेदवार घेऊ शकतात, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
करमाळा विधानसभा निवडणूक निकालावर माढा तालुक्यातील ३६ गावांचा मोठा परिणाम होतो, हे गत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले होते. गत विधानसभा निवडणुकीत पाटील, बागल व शिंदे अशीच तिरंगी लढत अटीतटीने व चुरशीची झाली होती. नारायण पाटील यांना ६० हजार ६७४, रश्मी बागल यांना ६० हजार ४१७ व संजयमामा शिंदे यांना ५८ हजार ३७७ मते मिळाली होती. अटीतटीच्या लढतीत नारायण पाटील अवघ्या ३५७ मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी तिघा उमेदवारांना मिळालेल्या मतांचे अंतर फारसे नव्हते. आता २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा तिघा उमेदवारांमधून विजयी होणारा उमेदवार एक हजार ते तीन हजार मताधिक्यानेच विजयी होणार, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मतदारसंघात गुलमोहरवाडी मतदान केंद्रात सर्वाधिक ९०.६७ टक्के तर केडगाव मतदान केंद्रात सर्वात कमी २८.६७ टक्के इतके मतदान झाले.
कोण कुणाला ठरणार भारी- तालुक्यातील पश्चिम भागात नारायण पाटील यांना पसंती दिल्याचे मतदारांनी सांगितले. रावगाव, पोथरे गटात नारायण पाटलांविषयी मतदारांनी नाराजी व्यक्त करून रश्मी बागल यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. संजयमामा शिंदे यांनी झेडपी अध्यक्षपदाच्या माध्यमातून केलेली कामे आणि माजी आ. जयवंतराव जगताप यांचा मिळालेला पाठिंबा याचा फायदा दिसून येत आहे. वंचितचे उमेदवार अतुल खुपसे माढा तालुक्यातील असून, पक्षाकडून निवडणुकीत नशीब अजमावित आहेत. ते किती मतदान घेतात व कोणाचे मतदान खातात यावरही बरेच अवलंबून आहे.