संताजी शिंदे
सोलापूर : पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणानंतर वारद फार्मसमोरील रस्ता ओलांडत असताना अनेक नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे. हा धोका लक्षात घेऊन लोखंडी पूल बांधण्यात आला, मात्र बेचाळीस पायºया चढून जाणार कोण? असा प्रश्न करीत स्थानिक नागरिक आम्हाला बोगदा हवा, अशी मागणी करीत आहेत. शॉर्टकट मार्ग शोधत अनेक लोक जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी रस्ता झाल्यानंतर या भागातील लोकांना वारद फार्म व मडकी वस्तीकडे ये-जा करता येत नव्हती. लोकांनी डिव्हायडरचा काही भाग फोडून व बॅरिकेडचे लोखंड तोडून स्वत:चा मार्ग करून घेतला. वारद फार्म व मडकी वस्तीकडील महिला व पुरुष सकाळी चिंचोळी एमआयडीसीला कामाला जात असताता. कामगारांना घेऊन जाण्यासाठी कंपनीच्या बस या मडकी वस्तीच्या सर्व्हिस रोडला थांबतात. कामगार बससाठी कसरत करून रस्ता ओलांडून जातात. या प्रयत्नामध्ये अनेक लोकांचे अपघात झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी याच भागात एका महिलेचा रस्ता ओलांडताना ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. स्थानिक नागरिक संतप्त झाल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी दोन्हीकडे तत्काळ गतिरोधक करण्यात आले.
लोकांना जाण्या-येण्याची सोय व्हावी म्हणून तत्काळ या भागात लोखंडी पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ८0 लाख रुपये खर्च करून एल अॅन्ड टी कंपनीच्या वतीने भव्य असा लोखंडी पूल उभारण्यात आला आहे. पूल सध्या पूर्णपणे सुस्थितीत असून तो लोकांसाठी सुरू केला आहे. मात्र या पुलावर जाण्यासाठी लोकांना ४२ पायºया चढाव्या लागत आहेत. वृद्ध महिला व पुरुषांना पायºया चढणे शक्य होत नाही. लहान मुलांना घेऊन पायºया चढणे अशक्य होत आहे. तरुण मंडळीही पायºया चढून जाण्याऐवजी तत्काळ डिव्हायडरवरून उडी मारून पलीकडे जाणे पसंत करीत आहेत. पुलावरून मात्र दिवसभरातून एखाद्दुसरा माणूस जाताना दिसतो.
दररोज एक अपघात निश्चित आहे..- सोलापूर-पुणे महामार्गावर जड वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. पूर्वी एकेरी मार्ग होता तेव्हा अनेक अपघात होत होते. चौपदरीकरणामुळे सध्या अपघाताचे प्रमाण कमी झाले असले तरी वारद फार्म, मडकी वस्ती व अन्य नगरांचा विकास या भागात झाल्याने स्थानिक नागरिकांचा वावर वाढला आहे. दोन्हीकडे असलेल्या सर्व्हिस रोडवर रिक्षा, बस किंवा अन्य वाहनांतून उतरल्यानंतर व वाहनात बसून जाण्यासाठी लोक रस्ता ओलांडत असतात. वेगाने येणारी वाहने धडकून अपघात होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी पूल बांधण्यात आला आहे, मात्र तेवढ्या उंचावर चढणे वृद्ध इसम व महिलांना शक्य होत नाही. रस्ता होण्याअगोदरच या वारद फार्म व मडकी वस्तीला जोडण्यासाठी भुयारी मार्ग करणे आवश्यक होते. - सोहेल नदाफ, स्थानिक नागरिक
पुलावरून जाण्यासाठी कमीत कमी ५ ते ८ मिनिटांचा वेळ लागतो. या भागातील कामगारांना कंपनीची गाडी वेळेत पकडायची असते, म्हणून दुभाजकावरून अवघ्या २ ते ३ मिनिटात जाता येते. लोकांना कामाची गडबड असते. - सलीम शेख, स्थानिक नागरिक
पुलासाठी अनेक आंदोलने केली, प्रशासनाला जाग मात्र मडकी वस्ती येथील पुलाचे काम व्यवस्थित झाले नाही. मक्तेदाराने केलेल्या कामामुळे पावसाळ्यात लोक घसरुन पडण्याची शक्यता आहे. जुन्या पुलाखालून रस्ता केला आहे, मात्र स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेता बोगद्यासाठी आंदोलन करू.- आनंद चंदनशिवे, नगरसेवक