राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राज्यातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिल्यास अनेक ठिकाणी पोटनिवडणूका बिनविरोध करण्याची परंपरा होती. काही ठिकाणी झाल्या तर विरोधाला विरोध म्हणून काही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने अपरिहार्यतेमुळे त्या घ्याव्या लागल्याची उदाहरणे आहेत.
पंढरपूरची पोटनिवडणूक ही प्रारंभी बिनविरोध होईल, असा अंदाज होता. मात्र शेवटच्या टप्प्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर एका पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्य पातळीवरील मोठे नेते येण्याची परंपराही नसताना येथे मात्र दोन्ही बाजूकडून आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौजच एकमेकांसमोर उभी ठाकली होती. महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मतदारसंघात तब्बल दोनवेळा मुक्काम ठोकत पाच दिवस प्रचार केला. त्यांच्यासोबत जयंत पाटील, धनंजय मुंडे, नाना पटोले, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, गुलाबराव पाटील आदी राज्यमंत्री मंडळातील मंत्री कामाला लागले होते. तर भाजपकडून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर आदींनी प्रचारसभा गाजवत निवडणुकीतील वातावरण ढवळून काढले होते.
या पोटनिवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार निवडणूक मैदानात उभे असले तरी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत झाली. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे व अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी निवडणूका लढविल्या असल्या तरी ते किती व कोणाची मते खाणार यावरच दोन्ही उमेदवारांचा जय-पराजय अवलंबून असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी आणखी अकरा दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत गावागावात दररोज आमचाच उमेदवार निवडून येणार असे म्हणत उत्सुकता वाढत आहे.
स्थानिक मुद्दे बाजूलाचपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सहकारी साखर कारखानदारीचे बिघडलेले नियोजन त्यामुळे शेतकरी, कामगारांना होणारा त्रास, मंगळवेढ्याची ३५ गावची पाणीपुरवठा योजना, रस्ते, पाणी, वीज, रोजगार आदी महत्त्वाचे मुद्दे असताना ही निवडणूक प्रारंभी महाविकास आघाडीकडून भावनिक मुद्द्यांवर लढविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर विरोधकांकडून तो मुद्दा खोडून काढत आ. परिचारक यांनी ज्यांच्यात नेतृत्व व कर्तृत्व असते त्यांनी भावनिक मुद्द्यावर मते न मागता विकासाच्या मुद्द्यावर मते मागावित असा प्रचार केला. या निवडणुकीत दोन्हीकडून झालेल्या प्रचारात स्थानिक मुद्दे मात्र पुन्हा अधांतरीच राहिल्याचे चित्र आहे.