सोलापूर : लॉकडाऊनमध्ये लग्न करण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त ५० जणांना परवानगी देण्याच्या नियमाने जास्त अडचण होत आहे. नेमक्या कोणत्या ५० जणांना बोलवायचे हा प्रश्न वधू-वरांच्या वडिलांना पडत आहे.
जून महिन्यामध्ये लग्नासाठी परवानगी घेण्यासाठी पोलिसांकडे जावे लागत होते. त्यानंतर ही जबाबदारी महापालिकेच्या झोन कार्यालयाकडे देण्यात आली. ५० जणांनाच परवानगी असल्याने अनेकांसमोर अडचणी आल्या. मात्र, यातूनही अनेकांनी मार्ग काढले. काहींनी लग्नाच्या आधीही जेवणाची पंगत वाढली. जेणेकरून जेवण केलेले अक्षता झाल्यावर घरी परत जाऊ शकतील. उर्वरित पाहुणे अक्षता झाल्यानंतर जेवण करून गेले.
आपले लग्न वाजतगाजत वरातीने व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. पण, आवाज आला तर कारवाई होईल या भीतीने वरात काढण्यात आली नाही. अनेकांनी परवानगी न काढताही कार्यक्रम उरकले. अंगणात किंवा घराजवळ असणाऱ्या मंगल कार्यालयात लग्नाचा कार्यक्रम घेतलेल्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले तर अनेकांनी लग्नपत्रिका प्रत्यक्ष न देता सोशल मीडियावरून दिली. या पत्रिकेत दुरूनच आशीर्वाद देण्याची विनंती करण्यात आली.
----------------
लग्नासाठी नियमावली
- - ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही
- - मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे
- - हॅण्डवॉश, सॅनिटायजरचा वापर करणे
- - थर्मल स्कीनिंगद्वारे प्रत्येकाची तपासणी
- - संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तूचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे
- - मंगल कार्यालयात एअरकंडिशनचा वापर न करता हवा खेळती राहण्यची व्यवस्था करणे
-------
परवानगीसाठी माेठी कसरत
- -परवानगी कुणाची घ्यायची हेच बहुतांश जणांना माहिती नसते. परवानगीसाठी पालिकेच्या झोन कार्यालयात जाणे आवश्यक असताना अनेकजण पोलीस ठाणे किंवा महापालिकेत जात आहेत.
- - सात दिवस आधी परवानगी घ्यावी लागत असल्यामुळे ऐनवेळी येणाऱ्या पाहुण्यांची यादी नोंदवावी लागते.
माझ्या भावाचे लग्न मोठ्या उत्सवाप्रमाणे करायचे होते. लग्न ठरल्यानंतर लॉकडाऊन आल्यामुळे खूप निर्बंध आले. फक्त ५० माणसात कार्यक्रम करावा लागला. अनेक पाहुणे मंडळी नाराज झाले. वाजत-गाजत वरात काढण्याचेही राहून गेले.
- सचिव लोंढे, वरबंधू
परवानगी कुठून घ्यायची यापासून अडचणीस सुरुवात झाली. पोलीस ठाणे, महापालिका येथे गेल्यानंतर कळले की झोन कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. लग्न सुरू असतानाही कोरोना संशयित कुणी आले तर नाही ना याची काळजी घ्यावी लागली.
- प्रकाश पाटील, वधूपिता
॰॰॰॰॰॰॰॰॰॰